यंदा पावसाळय़ात रेल्वे रुळांवर पाणी साचणार; होल्डिंग टँक उभारणीचा प्रस्ताव अभ्यासाच्या टप्प्यावरच लटकलेला

यंदाच्या पावसाळय़ातही मुंबईतील रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल प्रवास वारंवार कोलमडण्याची चिन्हे आहेत. पूरसदृश परिस्थिती उद्भवणाऱ्या भागांत पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या (होल्डिंग टँक) उभारणीचा प्रस्ताव अभ्यासाच्या प्राथमिक टप्प्यावर रेंगाळला आहे. प्रकल्पाच्या अभ्यासासाठी कोणत्या संस्थेला नियुक्त करायचे याचा निर्णय अद्याप बाकी आहे. यासंदर्भातील मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) प्रस्तावाला पश्चिम आणि मध्य रेल्वेसह संबंधित विविध यंत्रणांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

मुंबई महापालिकेने हिंदमाता परिसरात राबवलेल्या यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेऊन रेल्वे रुळांलगत होल्डिंग टँक उभारण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकल प्रवास अधिक सुकर करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर होल्डिंग टँक उभारणीच्या योजनेला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात योजनेचे घोडे अभ्यासाच्या प्राथमिक टप्प्यावरच अडलेले आहे. त्यामुळे पावसाळय़ात मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ वारंवार पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

z वर्षभर चालणाऱ्या अभ्यासात प्रस्तावित होल्डिंग टँकच्या भागांतील माती परीक्षण तसेच सध्याच्या ड्रेनेज व्यवस्थेचे तांत्रिक मूल्यांकन करण्यात येईल. त्याचबरोबर होल्डिंग टँकच्या माध्यमातून साठवण्यात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कशाप्रकारे करता येईल का? अतिरिक्त पाणी कुठे सोडता येईल हेही तपासले जाईल. यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्ट बँकेकडून अर्थसहाय्य घेतले जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

खुल्या निविदा प्रक्रियेतून संस्थेची निवड करणार

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या (एमयूटीपी) 3-ए टप्प्यांतर्गत भूमिगत होल्डिंग टँक उभारणीचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासासाठी खुली निविदा प्रक्रिया राबवून सर्वोत्तम संस्थेची निवड करण्यात येणार आहे.