आज ‘चौथा कोण’चा फैसला, मुंबई-दिल्लीचा मूड ऑफ करण्यासाठी पाऊसही सज्ज

गुजरातच्या विजयामुळे पंजाब आणि बंगळुरू प्ले ऑफमध्ये पोहोचले तर सोमवारी हैदराबादने लखनौचा गेम केल्यामुळे प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्लीपैकी एकाचे नाव पक्के होणार आहे. तो सामना बुधवारी वानखेडेवर खेळविला जाणार असून मुंबई जिंकली तर मुंबईचा प्ले ऑफ प्रवेशावर शिक्का बसेल आणि दिल्ली जिंकली तर चौथ्या संघाचा फैसला शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत ताणला जाईल. त्यामुळे आजच्या लढतीच प्ले ऑफ गाठण्याचे मुंबईचे ध्येय असले तरी पाऊसही मैदानात अवतरला तर प्ले ऑफच्या प्रवेशाचा मूड ऑफ होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई आणि दिल्ली हे आपले अखेरचे साखळी सामने हरल्यामुळे त्यांचे प्ले ऑफ स्थान लांबणीवर पडले. जर त्यांना आपला अखेरचा सामना जिंकता आला असता तर प्ले ऑफचा संघर्ष अजूनही कायम असता. मुंबईला गुजरातविरुद्धच्या सामन्यात हार सहन करावी लागली होती. सलग सहा विजयानंतर मुंबईला बसलेला हा पहिला धक्का होता. जर मुंबईने सात विजयही नोंदवला असता तर त्यांचे प्ले ऑफ स्थान आधी निश्चित झाले असते. दिल्लीचाही खेळ जोरात सुरू होता. आता दोन्ही संघांनी प्ले ऑफसाठी वानखेडेवर आपला सर्वोत्तम खेळ करण्याची शप्पथ घेतली आहे. ‘अभी नही तो कभी नहीं’ याच आवेशात दोन्ही संघ उतरणार आहेत. दोन्ही संघात एकापेक्षा एक तगडे संघ असल्यामुळे कोणता संघ बाजी मारेल, याचा अंदाज पुणालाही बांधता येत नाही.

बेअरस्टो, ग्लीसन, असलंका करारबद्ध

प्ले ऑफच्या शर्यतीत टिपून असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात तीन खेळाडू  बदलण्याचा डाव खेळला. विल जॅक्स, रायन रिकल्टन आणि का@र्बिन बॉश हे परदेशी खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा सामना खेळण्यासाठी लंडनला जाणार असल्याने त्यांच्या जागेवर जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चरिथ असलंका यांची निवड केली आहे.

विल जॅक्सची जागा इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो घेईल. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने तब्बल 5.25 कोटी रुपये मोजले. रायन रिकल्टनच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनला एक कोटी रुपयांना राखीव ठेवण्यात आले आहे. 75 लाख रुपयांना का@र्बिन बॉशची जागा चरिथ असलंका घेईल. मुंबई इंडियन्स प्ले ऑफसाठी पात्र ठरल्यास हे बदली खेळाडू उपलब्ध असतील.

इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जॉनी बेअरस्टो हा 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होता. बेअरस्टोने इंग्लंडसाठी एपूण 287 सामने खेळले आहेत. जॉनी बेअरस्टो आयपीएलमध्ये हैदराबाद आणि पंजाबसारख्या संघांचाही भाग राहिला आहे. असलंका सध्या एकदिवसीय आणि टी-20 स्वरूपात श्रीलंकेचा कर्णधार आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 134 वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. रिचर्ड ग्लीसन याने इंग्लंडसाठी सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी करण्यात तो माहीर आहे.

पावसाचीही सामन्यावर नजर

मुंबई आणि दिल्लीसाठी बुधवारचा सामना अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांच्या नजरा या लढतीवर लागल्या आहेत, पण या सामन्यावर पावसानेही करडी नजर ठेवल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे उभय संघांमध्ये धडकी भरली आहे. पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना पूर्ण करता यावा म्हणून दोन तासांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. या वेळेचा सामना पूर्ण करण्यासाठी सदुपयोग होतो की नाही, हे सामन्यादरम्यान पावसाची फटकेबाजी कशी होतेय, यावर अवलंबून असेल.