
दिव्यांगांच्या डब्यात एका दृष्टीहीन महिलेवर मुस्लिम कुटुंबाने हल्ला केल्याची घटना मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते ठाणे स्थानकांच्या दरम्यान घडली आहे. लोकलमध्ये चढल्यानंतर बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मुस्लिम कुटुंबाबरोबर एका दृष्टीहीन महिलेचा वाद झाला. त्यानंतर मुस्लिम कुटुंबाने या महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी कल्याण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून टिटवाळ्याच्या दिशेने निघालेली लोकल रात्री 9.12 वाजता कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात आली. या ठिकाणी सोनू गाडेकर (33) या नेहमीप्रमाणे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढल्या. सोनू या दृष्टीहीन आहेत. त्याचवेळी बसण्याच्या जागेवरून त्यांचा एका मुस्लिम कुटुंबाबरोबर वाद झाला. या वादातून मुस्लिम कुटुंबाने या महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. नंतर हे कुटुंब मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरून गेले. एका प्रवाशाने या मारहाणीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासून कल्याण पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकलमधील विंडो सीटवरून झालेल्या वादानंतर एका पुरुषाने महिला प्रवाशाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/8skxY8zLPt
— Saamana Online (@SaamanaOnline) May 20, 2025
बसण्यास जागा मिळत नाही
दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात नेहमीच सर्वसामान्य प्रवासी बसतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना बसण्यास जागा मिळत नाही. सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गर्दी झाल्यास दिव्यांगांना आपल्या निश्चित ठिकाणी उतरताही येत नाही. हे प्रकार आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे दिव्यांगांच्या डब्यात पोलीस बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. लोकलमध्ये दिव्यांगांवर होणाऱ्या हल्ल्याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.