ट्रॅफिक जाम करणाऱ्या विक्रोळीतील 830 वाहनांवर कारवाई, आरटीओचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

विक्रोळी स्थानकातील बेकायदा पार्किंग व त्यामुळे होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलली आहेत. गेल्या तीन महिन्यांत येथे बेकायदेशीरपणे पार्क करण्यात आलेल्या 830 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना चलन पाठवण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. वाहतूक पोलिसांनी याप्रकरणी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

विक्रोळी रेल्वे स्थानक रोडजवळ बेकायदेशीर  पार्किंग करण्यात येत असून या  पार्किंगमुळे गैरसोय होत असल्याचा आरोप करत दिगंबर मुणगेकर व इतर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. यतीन शहा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नुकतीच मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वाहतूक विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक लांडगे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांनी त्यात नमूद केले की, बेकायदेशीर  पार्किंग रोखण्यासाठी या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय अनधिपृत वाहने उभी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते.

हायकोर्टाने फटकारले

गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले. तुम्ही जनजागृती का करत नाही, की येथे  पार्किंग बेकायदेशीर आहे. याचिकाकर्त्यांनी मोहीम राबवायला हवी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी की, येथे पार्किंग बेकायदेशीर असून सर्वसामान्यांची गैरसोय होते. त्यामुळे मोहीम सुरू करा. तुम्ही किती लोकांना पार्किंग न करण्यासाठी पटवून देऊ शकता? त्याबाबत पुढच्या तारखेला आम्हाला अहवाल द्या असे खंडपीठाने सांगितले.