
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांतील सुविधांचा पोकळ दिखावा उघडकीला येत आहे. हार्बर लाईनवर वडाळा स्थानकाचा पुनर्विकास करताना दोन ठिकाणी नवीन नामफलक लावण्यात आले. दोन्ही नामफलकांतील ‘वडाळा’ नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये विसंगती आहे. त्यामुळे ‘अमृत भारत’चे ‘नाव मोठे, लक्षण खोटे’ अशी चर्चा आहे.
एका नामफलकामध्ये वडाळाचा उल्लेख करताना ‘डब्ल्यू’ तर दुसऱ्या नामफलकात ‘व्ही’ आद्याक्षर लिहिले आहे. रेल्वेचा पुनर्विकास एवढा संभ्रमावस्थेत कसा, असा खरमरीत सवाल प्रवासी करत आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासन नावातील चूक सुधारण्यासाठी तत्परता दाखवते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतर स्थानकांच्या पुनर्विकासातही अनेक त्रुटी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.