तब्बल एक कोटी रुपयांच्या जनावराच्या मांसाची वाहतूक, न्यायालयाकडून आरोपीला अटकेपासून संरक्षण

तब्बल एक कोटी रुपयांच्या जनावराच्या मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.

मोहम्मद कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. यात होणाऱ्या अटकेच्या भीतीने कुरेशीने अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे. वडगाव-मावळ सत्र न्यायालयाने कुरेशीला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तपास अधिकाऱ्यासमोर चौकशीसाठी हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने कुरेशीचा अटकपूर्व जामीन रद्द केला. पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी विनंती कुरेशीने केली.

न्या. शाम चांडक यांच्या सुट्टीकालीन एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. तपास अधिकाऱ्यासमोर चौकशीसाठी हजर रहा, असे आदेश देत न्यायालयाने कुरेशीला अटकेपासून संरक्षण दिले. यावरील पुढील सुनावणी 4 जून 2015 रोजी होणार आहे.

 मांस गायीचे की म्हशीचे

n हे मांस म्हशीचे असल्याचा दावा कुरेशीने केला आहे. तर हे मांस गायीचे असल्याचा केमिकल अॅनलायझर अहवाल आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

n गायीच्या मांसाची वाहतूक होत असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कुरेशीच्या ट्रकची तपासणी केली. यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे मांस सापडले. 30 मार्च 2025 रोजी याचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी नंतर हे मांस नष्ट केले.