अमेरिकेने काढून टाकलेल्या शास्त्रज्ञांना जगभरातून मागणी, अनेक परदेशी विद्यापीठे काम देण्यास इच्छुक

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने संशोधनासाठी असलेल्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली. त्यामुळे हजारो शास्त्रज्ञांनी अनुदान गमावले आणि संशोधकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. मात्र याच शास्त्रज्ञांना आता जगभरातून मागणी येतेय. अनेक परदेशी विद्यापीठांनी या शास्त्रज्ञांवर लक्ष केंद्रित केलेय.

फ्रान्समधील एक्स मार्सेली विद्यापीठाने ‘विज्ञानासाठी सुरक्षित ठिकाण’ अशी मोहीम सुरू केली. याअंतर्गत अमेरिकेतील शास्त्रज्ञांना आमंत्रित करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या प्रमुख अण्णा मारिया अरेबिया म्हणाल्या, काही टॅलेंट असलेल्या लोकांना आकर्षित करण्याची आम्हाला एक अतुलनीय संधी दिसतेय. कॅनडामध्येही असे कार्यक्रम राबवले जात आहेत.

दुसऱ्या महायुद्धापासून अमेरिकेने स्वतंत्र विद्यापीठे आणि संघीय संस्थांमध्ये केलेल्या वैज्ञानिक संशोधनात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले आहेत. त्या निधीमुळे अमेरिकेला जगातील आघाडीची वैज्ञानिक शक्ती बनण्यास मदत झाली आणि त्यामुळे सेलफोन आणि इंटरनेटचा शोध लागला. तसेच कर्करोग, हृदयरोग आणि स्ट्रोकवर उपचार करण्याचे नवीन मार्ग निर्माण झाले, असे सायन्स जर्नलचे मुख्य संपादक होल्डन थॉर्प यांनी सांगितले. पण आज ती व्यवस्था हादरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बजेटला कात्री

जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या प्रशासनाने अनेक बदल केले आहेत. संघीय विज्ञान खर्च, राष्ट्रीय विज्ञान अकादमी, राष्ट्रीय आरोग्य संस्था, नासा आणि इतर एजन्सींमध्ये कर्मचारी पातळी व अनुदान निधीमध्ये मोठी कपात केली आहे. तसेच काही खासगी विद्यापीठांना मिळणारे संशोधन डॉलर्स कमी केले आहेत.