गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक आजपासून बंद, चाकरमान्यांना रस्ते मार्गाने गाठावी लागणार मुंबई

मुंबई गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग मांडवादरम्यान सुरू असणारी प्रवासी जलवाहतूक सेवा उद्यापासून बंद ठेवण्याचे परिपत्रक मेरिटाईम बोर्डाने काढले आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी पावसाळ्यात जलवाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जलवाहतूक बंद झाल्यामुळे चाकरमान्यांना आता रस्तेमार्गे मुंबई गाठावी लागणार आहे.

वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेट वे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मात्र पावसाळा सुरू होणार असल्याने या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. उद्यापासून बंद होणारी ही वाहतूक थेट येत्या 31 ऑगस्टनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. जलवाहतूक बंद झाल्यामुळे चाकरमान्यांना आता रस्ते मागनिच मुंबई गाठावी लागणार आहे. परिणामी लाटांवर हेलकावे खात मांडवाला जाण्यासाठी काही दिवस ब्रेक घ्यावा लागणार आहे.

पर्यटनावर परिणाम होणार
पीएनपी, मालदार, अजंठा, अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात. पावसाळ्याचे तीन महिने ही सेवा बंद केली जाते. पावसाळ्यात बंद राहणाऱ्या या जलवाहतुकीचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होतो. मुंबईकरांची मांडवा किनाऱ्याला पर्यटनासाठी पसंती असते. मांडवा इथे पर्यटनाच्या दृष्टीने अनेक गोष्टींचा विकास झाला आहे. वेगवेगळ्या समुद्री खेळांसह निवांत आणि शांत वातावरणासाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या मांडवाला पर्यटक पसंती देतात. मात्र जलवाहतूक बंद झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

रो-रो सेवा मात्र सुरूच राहणार
आठ ते नऊ महिन्यांत जवळपास दरदिवशी दोन ते तीन हजार प्रवासी पर्यटनासाठी जलवाहतुकीद्वारे अलिबागमध्ये मुंबईहून येत असतात. मात्र जलवाहतूक बंद असल्यानंतर अलिबागसह मांडवा इथल्या पर्यटनावरही परिणाम जाणवतो. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच मार्गावरील जलवाहतूक यादरम्यान बंद राहणार असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावर सुरू असणारी रो रो सेवा तसेच दिघी ते आगरदांडा मार्गावरील जंगल जेट्टी वाहतूक मात्र सुरूच राहणार आहे.