
ओडिशावरून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप गेल्या 3 वर्षांपासून वनविभागासह गावाकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. यात दोन टस्कर हत्तींची भर पडली असून त्यांनी आठवडाभरापूर्वी छत्तीसगडहून गडचिरोलीच्या कुरखेडा आणि धानोरा तालुक्यात प्रवेश केला होता. हे हत्ती शनिवारी मध्यरात्री थेट गडचिरोली शहरात दाखल झाल्याने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली.
शहरातील लांजेडा परिसरात टस्कर हत्तींनी प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या प्रवेशाची माहिती मिळताच पहाटे तीनच्या सुमारास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही हत्तींना आमिर्झा जंगलाच्या दिशेने पळवून लावले. या हत्तींनी 11 मे रोजी सकाळी मानापूर गावात धुमाकूळ घातला होता. त्यावेळी नागरिकांनी पळापळ सुरू केली होती. त्यात एक महिला खाली पडून जखमी झाली होती.