अवकाळी पावसामुळे डोळ्यादेखत कांद्याचा चिखल झाला, चिमुकलीची आर्त हाक आणि मिलिंद नार्वेकरांनी दिला मदतीचा हात

अवकाळी पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पीकाचा डोळ्यादेखत चिखल झाला आहे. बीड जिल्ह्यातील दरेकर कुटुंबाला सुद्धा अस्मानी संकटाचा जबर तडाखा बसला. या तडाख्यात त्यांचा तीन एकरवर लावलेला कांदा वाहून गेला आहे. शेतकरी महेश बापू दरेकर, त्यांची पत्नी सोनम दरेकर आणि त्यांच्या लहान चिमुकलीचा पावसामुळे झालेल्या चिखलातून कांदा वेचतानाचा व्हिडीओ साऱ्या महाराष्ट्राने पाहिला. आम्ही पिकवलेला सर्व कांदा सडून गेला, आता “मी आता शाळेत कशी जाऊ? असा सवाल तिने सरकारला केला होता. तसेच दरेकर कुटुंबाने सरकार दरबारी मदतीची आशा व्यक्त केली होती. त्या मुलीच्या मदतीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर हे धावून गेले असून त्यांनी दरेकर कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश बापू दरेकर आणि त्यांची पत्नी सोनाली दरेकर यांनी पाच महिन्यापूर्वी तीन एकरमध्ये कांद्याची लागवड केली होती. कांदा काढून ठेवला होता आणि मार्केटमध्ये घेऊन जाण्याच्या ते तयारीत होते. कांदा विकून मिळणाऱ्या नफ्यावर त्यांची पुढची आर्थिक गणित जुळली होती. परंतु मान्सूनपूर्व पावसामुळे त्यांचा संपूर्ण कांदा वाहून गेला आणि कांद्याचा अक्षरश: चिखल झाला. त्यामुळे दरेकर कुटुंबाच मोठं नुकसान झालं. महेश दरेकर यांची छोटी मुलगी प्रगती दरेकर ही सुद्धा आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आपल्यापरीने मदत करत असल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिलं आणि सर्वांचेच डोळे पाणावले. मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे मी आता शाळेत कशी जाऊ? असा प्रश्न तिने सरकारला केला होता. या चिमुकलीची आर्त हाक मिलिंद नार्वेकर यांनी ऐकली आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला.