
बोटावर मोजण्याएवढे पक्ष शिल्लक राहिलेल्या एनडीएला उत्तर प्रदेशात भगदाड पडले आहे. अपना दल आणि निषाद पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची दोन्ही पक्षांनी भाजपला पुसटशी कल्पनाही दिली नाही.
उत्तरप्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपने अपना दल आणि निषाद पार्टीच्या टेकूवर जिंकल्या. त्याचे फळही या दोन्ही पक्षांना मिळाले. मात्र आता उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच या दोन्ही पक्षांनी भाजपचा हात सोडला आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (एस)ने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ निषाद पार्टीनेही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतंत्र चूल मांडत असल्याची घोषणा केली.
अपना दल आणि निषाद पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करेल याची भाजपने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी लागोपाठ घोषणा करताच भाजपला मोठा हादरा बसला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आमच्या मित्रपक्षांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचे आम्हाला माध्यमातूनच कळले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएमध्ये अद्याप या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही मौर्य यांनी सांगितले.