
हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच हिंदुस्थानच्या विमान वाहतूक सुरक्षा नियामक (बीसीएएस) ने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केली असून सेलेबीचे काम दुसऱ्या कंपनीला देण्यासाठी निविदा काढल्या आहेत. मात्र सेलेबीचे म्हणणे जोपर्यंत ऐकून घेत नाही तोवर निविदेवर अंतिम निर्णय घेऊ नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला दिले आहेत.
तुकाaच्या सेलेबीची उपकंपनी सेलेबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस ही मुंबई विमानतळावर तळ आणि पूल सेवा हाताळण्याचे काम करते. हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्की देश पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याने हिंदुस्थानच्या विमान वाहतूक सुरक्षा नियामक (बीसीएएस) ने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केली. त्यामुळे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एमआयएएल) करार अचानक रद्द केल्याने कंपनीचे नुकसान होत असल्याचा दावा करत सेलेबीच्या उपकंपन्यांनी हायकोर्टात तीन याचिका दाखल केल्या आहेत.




























































