
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 103 रेल्वे स्थानकांचा ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात आल्याचा दावा करीत त्यांचे नुकतेच लोकार्पण केले. यात मुंबईतील परळ, माटुंगा, चिंचपोकळी आणि वडाळा या रेल्वे स्थानकांचा समावेश होता. प्रत्यक्षात सुविधांची कमतरता असलेल्या, मात्र कोट्यवधी रुपयांचा चुराडा केलेल्या ‘अमृत भारत’ रेल्वे स्थानकांचे पितळ मुंबईतील पहिल्या पावसाने उघडे पाडले. चारही स्थानकांत जागोजागी पाण्याची गळती सुरू होती. तसेच लोकार्पण सोहळ्यात ‘विकासाचा शो’ करण्यासाठी वापरलेले साहित्य ठिकठिकाणी पडले होते. त्याचा त्रास मुंबईकर प्रवाशांना सहन करावा लागला. त्यामुळे या चार स्थानकांच्या पुनर्विकासावर खर्च केलेले 100 कोटी रुपये पाण्यात गेल्याची नाराजी मुंबईकरांनी व्यक्त केली.