
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जीन्स घातल्यावरुन झालेल्या वादाचं रुपांतर खून करण्यापर्यंत गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोठ्या भावाला भोपाळ रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय ओमकार गिरी आणि 19 वर्षीय विवेक गिरी हे दोघे सख्खे भाऊ लग्न आणि पार्ट्यांमध्ये वेटरचं काम करत होते. दोघांमध्ये कपड्यांवरून नेहमीच वाद होता होता. विवेक नेहमीच ओमकारचे कपडे आणि शुज घालत असे, त्यामुळे दोन्ही भावांमध्ये सतत खटके उडत होते. रविवारी (25 मे 2025) रात्री तीन वाजता लहान भाऊ विवेक कामावरून घरी आला. त्याने ओमकारची जीन्स घातली होती. ओमकारने जीन्स पाहताच त्याला राग अनावर झाला त्याने वाद घालायला सुरुवात केली. ओमकारने रागाच्या भरात चाकू उचलला आणि विवेकचा गळाच चिरला. यामध्ये विवेकचा जागीच मृत्यू झाला. सकाळी पाच वाजचा जेव्हा वडील मुन्ना गिरी घरी आले, तेव्हा घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि फरार झालेल्या ओमकारलाही अटक केली.