प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरला, निर्दयी पत्नीचे कृत्य

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या केली. हत्या करून दोघेही परागंदा होणार होते. परंतु वेळीच याची माहिती मिळाल्यानंतर अॅण्टॉप हिल पोलिसांनी तत्काळ शोधाशोध करून दोन्ही आरोपींना अटक केली.

इस्माईल अली शेख (37) असे मृतकाचे नाव आहे. तो त्याची पत्नी सुमय्या शेख (26) हिच्यासोबत राजीव गांधी नगर झोपडपट्टीत राहत होता. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास परिसरात शांतता असताना इस्माईलचा गळा चिरून हत्या करण्यात आली. काही वेळाने शेजारच्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी अॅण्टॉप हिल पोलिसांत तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेत प्रभारी निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी मदने व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा इस्माईलची पत्नी हिला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर मी प्रियकर सकलाईन शेख (27) याच्या मदतीने इस्माईलचा गळा चिरला आणि ठार मारल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी लगेच शोधाशोध करून मीरा दातार दर्गा परिसरातून सकलाईनला पकडले. आम्ही दोघांनी इस्माईलचा गळा चिरला, मग त्याचा मृतदेह गॅलरीमध्ये आणून  ठेवला, अशी कबुली आरोपींनी दिल्याने दोघांनाही गुन्हा दाखल झाल्यापासून चार तासांच्या आत अटक करण्यात आली.