
हिंदुस्थानी खेळाडूंनी आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सलग तिसऱया दिवशी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने आशियाई अॅथलेटिक्सच्या स्टिपलचेसचा सुवर्ण दुष्काळ संपवण्याचा पराक्रम केला. त्याने तब्बल 36 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानला 3 हजार मीटर स्टिपलचेस शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडविला. याआधी 1989 मध्ये दिना राम यांनी या शर्यतीत अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते.
दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेत शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर अविनाश साबळे सहा फेऱया शिल्लक असताना तिसर्या क्रमांकावर होता. शर्यतीचा मंद वेग असूनही तो शांत आणि आत्मविश्वासाने धावत होता. दुसऱया फेरीच्या मध्यावर त्याने आघाडी घेतली. चार फेऱया शिल्लक असताना साबळे अजूनही आघाडीवर होता, मात्र दोन जपानी धावपटू त्याचा पाठलाग करत होता. तीन फेऱया उरल्यावर जपानच्या युटारो निनाएने अविनाशला पिछाडीवर टाकले. शेवटची फेरी सुरू झाल्यानंतरही अविनाश हा अजूनही निनाएच्या मागेच होता, मात्र त्यानंतर अविनाशने राखून ठेवलेल्या दमचा वापर करीत वेग वाढवला आणि पहिल्या अडथळय़ाच्या आधीच जपानी धावपटूला मागे टाकले. त्यानंतर कोणीच त्यांना गाठू शकले नाही. अखेरच्या क्षणी सुस्साट सुटलेल्या अविनाश साबळेने शेवटचा वॉटर जंप पूर्ण करत झपाटय़ाने शेवटचा टप्पा पार केला आणि सहजपणे 8 मिनिटे 20.92 सेपंद वेळ नोंदवित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जपानच्या युटारो निनाएला 8 मिनिटे 24.41 सेपंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर कतारच्या झकारियाने 8 मिनिटे 27.12 सेपंद वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली.
ज्योतीने 2023 मधील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 13.09 सेपंदांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले होते. तिची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ 12.78 सेपंद आहे. जो ज्योतीचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती ज्योती 100 मी. अडथळा शर्यतीत सुवर्णपदकाची पुनरावृत्ती करणाऱया पाचवी अॅथलीट ठरली आहे. यापूर्वी जपानची एमी अकीमोटो (1979, 1981, 1983) आणि चीनच्या झांग यू (1991, 1993), सु यिनपिंग (2003, 2005), आणि सुन यावेई (2009, 2011) या तीन धावपटूंनी हे यश मिळवले होते.
अविनाशचे आशियाई स्पर्धेत वर्चस्व
महाराष्ट्राच्या बीड जिह्यातील मांडवा गावातील अविनाश साबळेच्या नावावर 3 हजार मीटर स्टिपलचेस शर्यतीतील अनेक राष्ट्रीय विक्रम आहेत. त्याने याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेतही हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिलेले आहे. आता त्याने आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही सोनेरी यश संपादन करून आशियाई स्पर्धेतील हिंदुस्थानचा दबदबा दाखवून दिला. अविनाशने याआधी 2019 च्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अविनाश हा तिसरा हिंदुस्थानी धावपटू ठरला. त्याच्याआधी 1975मध्ये हरबैल सिंगने, तर 1989मध्ये दिना राम या खेळाडूंनी हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले होते.
ज्योती याराजीचे विक्रमी सुवर्णयश
हिंदुस्थानी महिला अॅथलीट ज्योती याराजी हिने नेत्रदीपक कामगिरी करत 26 व्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील 100 मी. अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ज्योतीने ही शर्यत 12.96 सेपंदांत पूर्ण करत आपले सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. तिच्या या विजयानंतर या स्पर्धेत नवीन विक्रमही नोंदवला गेला. यापूर्वी कझाकस्तानच्या ओल्गा शिशिगिना (1998) आणि चीनच्या सुन यावेई (2011) यांनी 13.04 सेपंदाचा वेळ नोंदवला होता. ज्योतीने हा विक्रम आज मोडीत काढला.



























































