
शहरात ‘कोरोना’ ची शंभरी पार झाली असल्याने आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे ठाणेकरांनो सावधान… कोविडने शहरात पुन्हा एकदा शिरकाव केला असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून ठाण्यात दोन आकडी रुग्ण कोरोनाबाधित असताना आज अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ठाण्यात आज 5 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 108 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी 13 खासगी तर 3 जणांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या महाभयंकर राक्षसाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. उच्चभ्रू वस्तीसह झोपडपट्टी भागात कोरोनाने पुन्हा हात- पाय पसरायला सुरुवात केली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच मागील आठवड्यात मुंब्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली असून सिव्हिल तसेच कळवा रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 59 रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले असून 32 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पस्ट केले आहे.
ही लक्षणे असल्यास तत्काळ टेस्ट करा !
एकीकडे ऊन आणि पावसाच्या कोसळधारा सुरू असल्याने वातावरणात बदल होत असताना दुसरीकडे विविध आजारांचा धोका वाढला आहे. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला किंवा अंगदुखी असल्यास तत्काळ कोरोना टेस्ट करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले
आहे.
वसईत पहिला बळी
वसईत कोरोनामुळे एका 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रहेजा रुग्णालयात उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ही माहिती दिली.
कोरोनाशी लढण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विरार पूर्वेच्या चंदनसार येथील जीवदानी रुग्णालयात सुरुवातीला 25 खाटा या विलगीकरणासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 4 हजार जणांची तपासणी केली आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.