रेकॉर्डब्रेक! यूपीआयवरून 25 लाख कोटींचा व्यवहार

हिंदुस्थानात आता कोणत्याही खरेदीसाठी कॅशचा वापर न करता डिजिटल पेमेंटवरून अर्थात यूपीआयवरून ट्रान्झॅक्शन केले जात आहे. मे 2025 मध्ये म्हणजेच अवघ्या महिनाभरात 18.68 बिलियन ट्रान्झॅक्शन झाले असून याचे एकूण मूल्य तब्बल 25.14 लाख कोटी रुपये इतके मोठे आहे. 2024-25 मध्ये यूपीआय पेमेंट्सने 83.7 टक्क्यांच्या वाढीची नोंद केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 टक्के जास्त आहे. मे 2025 मध्ये 18.68 बिलियन ट्रान्झॅक्शन झाले असून एप्रिलच्या तुलनेत हे 4 टक्के जास्त आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिलेल्या माहितीनुसार, यूपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये वार्षिक आधारावर 33 टक्के वाढ झाली आहे. मेमध्ये सरासरी दर दिवशी 602 मिलियन यूपीआय ट्रान्झॅक्शन झाले आहेत. या ट्रान्झॅक्शनचे एकूण मूल्य 81,106 कोटी रुपये आहे. हिंदुस्थानात 2016 मध्ये सुरू झालेल्या यूपीआयने नोटाबंदीनंतर खऱ्या अर्थाने आपले पाय रोवले. देशात यूपीआय आता सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट बनले आहे. गुगलपे, फोनपे आणि पेटीएमद्वारे लोक सर्रास डिजिटल पेमेंट करत आहेत. केवळ देशात नव्हे, तर जागतिक स्तरावरसुद्धा हे डिजिटल पेमेंट वेगाने पसरत आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये यूपीआयच्या वापरामध्ये 83.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, तर गेल्या वर्षी हा आकडा 79.7 टक्के होता. आरबीआयने केलेल्या घोषणेनुसार, पुढील चार वर्षांत यूपीआय जगातील 20 देशांत पोहोचेल. यूपीआय सध्या भूतान, नेपाळ, फ्रान्स, मॉरिशस, सिंगापूर, श्रीलंका आणि यूएईसारख्या देशांत स्वीकारला जात आहे. याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना, पर्यटकांना आणि व्यावसायिकांना मिळत आहे. सरळ, सुरक्षित आणि वेगाने पेमेंट करण्याच्या पद्धतीमुळे डिजिटल व्यवहार यूपीआयवरून केला जात आहे. सामान्य नागरिकांसोबतच व्यापारी आणि सरकारी सेवेसाठी याचा वापर केला जात आहे.