मिंधे गटाचे ऐलान.. निवडणुकीत अजित पवार गटाशी युती नाही, रायगडात महायुतीत भडका

रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंधे गट व अजित पवार गट यांच्यात वारंवार खटके उडत असतानाच आता महायुतीमध्ये भडका उडाला आहे. आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाशी युती करणार नाही, असे ऐलानच मिंधे गटाने केले आहे. अगदी नेत्यांचे वरून आदेश आले तरी आम्ही जुमानणार नाही, अशी दमबाजी मिंधे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.

महाड येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी अजित पवार गटावर आगपाखड केली. ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत युती नको अशीच आमची भूमिका आहे. आम्ही भाजपसोबत युती करू पण काहीही झाले तरी अजित पवार गटाला सोबत घेणार नाही, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

तटकरेंना राजकारणातून हद्दपार करणार
महेंद्र दळवी यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचा उल्लेख चिटर फॅमिली असा केला. त्यांना आता राजकारणातून हद्दपार करणार असल्याची घोषणाच दळवी यांनी केली. सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही. कायदा आम्हालाही समजतो. ज्यादिवशी ही बॅद रायगडामधून बाहेर काढू तेव्हाच येथील जनता खूश होईल, अशी टीकाही त्यांनी केली.

हे तर मुगलांचे वंशज – परांजपे
अजित पवार गटाचे पदाधिकारी आनंद परांजपे यांनी महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत टीका केली. मिंधे गटाच्या आमदारांचा उल्लेख त्यांनी मुगलांचे वंशज असा केला. परांजपे म्हणाले की, महेंद्र थोरवे यांचा गुवाहाटीमध्ये नाच करतानाचा व्हिडीओ संपूर्ण देशाने बघितला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या औकातीत राहा, असा इशाराही त्यांनी दिला.