लेखापालाला मिळाली 58 लाखांची भरपाई, अपघातात पाय गमावला; चार वर्षांनंतर मिळाला न्याय

अपघातात पाय गमावलेल्या एका लेखापालाला तब्बल चार वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरण या विशेष न्यायालयाने 58 लाख 26 हजार रुपयांची भरपाई दिली आहे. एस. एन. शाह यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधिकरणाने कायदेशीर प्रक्रियेनंतर हा निर्णय दिला आहे. दरम्यान, उशिरा का होईना न्याय मिळाला अशी भावना लेखापालाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

मालाड पश्चिम येथील पीडित रहिवासी 24 फेब्रुवारी 2021 रोजी विलेपार्लेजवळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून आपल्या मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी वेगाने येणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने त्याच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातामुळे ते खाली पडले आणि बसचे पुढचे चाक त्याच्या डाव्या पायावरून गेले. अपघातानंतर पीडितेला अनेक गंभीर दुखापती झाल्या, सुरुवातीला त्यांच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये जवळपास एकूण वैद्यकीय खर्च 17 लाख 46 हजार रुपये झाला.

विमा कंपनीचा सुरुवातीला विरोध
बसचालकावर मोटार वाहन कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बसमालकाने दाव्याला विरोध केला नाही त्यामुळे कार्यवाही एकतर्फी पार पडली. यामध्ये सहभागी झालेल्या विमा कंपनीने भरपाईला विरोध केला, परंतु नंतर आरोप सिद्ध होताच भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. एकूण रकमेपैकी 28.26 लाख रुपये थेट दावेदाराला तर 30 लाख रुपये पाच वर्षांच्या मुदत ठेवीत ठेवले जातील. न्यायाधिकरणाने एका महिन्यात भरपाई जमा करण्याचे आदेश दिले.