
गेल्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने घाईघाईने बोगस मतदार यादीच्या आधारावर ही निवडणूक घेऊ नये. यापूर्वी कायद्यात अनेक उणिवा दिसल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत केल्या पाहिजेत, अशी मागणी अॅड. असीम सरोदे यांनी केली.
मतदार यादीमधील त्रुटी आणि बोगस मतदारांच्या नोंदणी संदर्भात अॅड. सरोदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सद्यस्थितीत न्यायालयात देखील चांगले वातावरण राहिले नाही. न्यायालयात याचिका अनेक दिवस प्रलंबित राहतात. निवडणूक आयोगाने स्वायत्तता गमावली असून, ते एका राजकीय पक्षाचे पाळीव झाले आहे. राज्यात ईव्हीएमपेक्षा सर्वात मोठा बोगस मतदारयाद्या घोटाळा झाला आहे. जगात मोठे प्रगत देश बॅलेट पेपरवर निवडणूक घेतात तशा आपल्याकडे झाल्या पाहिजे, असे अॅड. सरोदे म्हणाले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ज्या मतदार याद्या तयार केल्या त्याचआधारे संबंधित निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. सदर याद्या या संशयास्पद आणि चुकीच्या असल्याने त्याचा वापर आगामी निवडणुकीत करू नये, अशी मागणी त्यांनी केली. सध्याच्या सरकारमध्ये बोगस मतदार यादीद्वारे अनेक जण निवडून आले आहेत. 288 विधानसभा मतदारसंघापैकी 100 पेक्षा अधिक मतदारसंघातील निवडणुकीबाबत आव्हान याचिका दाखल झाल्या आहेत, याकडेही अॅड. सरोदे यांनी लक्ष वेधले.



























































