नालेसफाई, काँक्रिटीकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करा! काँग्रेसची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेत सध्या भ्रष्टाचार बोकाळला आहे. नालेसफाई, रस्ते काँक्रिटीकरण, घनकचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार होत असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. उपस्थित केलेल्या सर्व मुद्दय़ांवर राज्य सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले. यावेळी आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक उपस्थित होते.

एमटीएनएल, बीएसएनएल, बेस्ट या संस्थांमध्ये तोटा दाखवायचा व नंतर या संस्था एखाद्या उद्योगपतीला द्यायचा असे षड्यंत्र सुरू आहे. बेस्टचे खच्चीकरण सुरू आहे आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली बेस्टचा हा विभाग अदानीला देण्याचे घाटत आहे. बेस्टला सक्षम करण्याची गरज असून त्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने बेस्ट उपक्रमाला आणखी एक हजार कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.