ठसा – न्या. अतुल चांदूरकर

>> अॅड. प्रतीक राजूरकर

नागपूर विधी क्षेत्रासाठी 2025 सालचा मे महिना अत्यंत महत्त्वाचा ठरला. देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई यांनी पदभार स्वीकारल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश अतुल चांदूरकर यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याची कॉलेजियमने पेंद्र सरकारला शिफारस केली. 30 मे 2025 रोजी न्या. अतुल चांदूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. एमएमआरडीए निविदा प्रकरणात सरन्यायाधीशांच्या पीठाचे न्या. अतुल चांदूरकर सहयोगी सदस्य होते. 2030 सालापर्यंत न्या. अतुल चांदूरकर यांचा सर्वोच्च न्यायालयात कार्यकाळ असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे सहकारी सदस्य म्हणून ते भविष्यात जबाबदारी पार पाडतील. कनिष्ठ, उच्च न्यायालयात वकिलीचा प्रचंड अनुभव, उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेले अनेक महत्त्वपूर्ण निकाल विधी क्षेत्रासाठीचे त्यांचे भरीव योगदान दर्शविणारे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्या. चांदूरकर यांनी महाविद्यालयात हिजाबबंदी योग्य, माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील सुधारणांना असंवैधानिक ठरवणे, मुंबईतील औद्योगिक जमिनींच्या बाबतीत दिलेले निकाल महत्त्वपूर्ण ठरले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याअगोदर त्यांच्यासमोर मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानाला राज्य सरकार वास्तू वारसा कधी जाहीर करणार या प्रकरणात सुनावणी सुरू होती.

वकील ते न्यायाधीश

न्या. चांदूरकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट शाळेतून पूर्ण झाले. वाडिया महाविद्यालय आणि आयएलएस विधी महाविद्यालयातून त्यांनी अनुक्रमे पदवी व विधी शिक्षण पूर्ण केले. 1988 मध्ये पुण्यातून विधी शाखेचे पदवीधर झाल्यावर न्या. चांदूरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात नाईक वकिलांकडे वकिली व्यवसायास सुरुवात केली. पुढे 1992 मध्ये ते नागपूरला स्थायिक झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकिली करत असतानाच न्या. चांदूरकर यांनी भाडे कायदा आणि नगरपालिका, पंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा या विषयांवर सखोल कायदेशीर विश्लेषण करणारी दोन पुस्तके लिहिली आहेत. 25 वर्षे यशस्वीपणे वकिली केल्यावर जून 2013 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. वकिली करत असताना नवोदित, कनिष्ठ वकिलांसाठी ज्येष्ठ वकील म्हणून न्या. चांदूरकर आधारस्तंभ होते. कनिष्ठ वकिलांना त्यांनी नेहमी मार्गदर्शन तर केलेच, त्याव्यतिरिक्त व्यवसायातील आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करत अनेक प्रकरणांत त्यांनी कनिष्ठ वकिलांच्या प्रकरणात प्रतिनिधित्व केले. वकिलीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून न बघता न्या. चांदूरकर यांनी कायदेशीर हक्क प्रदान करणारे माध्यम म्हणूनच सदैव बघितले.

काwटुंबिक पार्श्वभूमी

चांदूरकरांचे कुटुंब मूळचे अमरावती जिह्यातील चांदूर बाजारचे. न्या. चांदूरकरांचे वडील अभियंता असल्याने ते पुण्यात कार्यरत होते. न्या. चांदूरकरांचे आजोबा नरहर चांदूरकर हे संस्कृत पंडित आणि निष्णात वकील होते. न्या. चांदूरकर यांचे काका विधी क्षेत्राशी संबंधित होते. काका मधुकर चांदूरकर मुंबई उच्च न्यायालयात 1967 मध्ये न्यायाधीश नियुक्त झाले. 1984 मध्ये मधुकर चांदूरकर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नियुक्त झाले. पुढे त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून 2 एप्रिल 1984 रोजी नियुक्ती करण्यात आली. 1988 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. महाराष्ट्र लॉ जर्नल विधी क्षेत्रातील विविध निकालांचे संकलन करणाऱया मासिक संदर्भ ग्रंथाचे संपादन न्या. चांदूरकर यांच्या कुटुंबातील सदस्यांकडेच आहे. न्या. अतुल चांदूरकर यांनी विधी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे.