
महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाने ससून डॉकमध्ये मासेविक्रीसाठी येणाऱया महिलांना प्रवेश नाकारला होता. त्यामुळे हजारो कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मच्छीमार समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आवाज उठवला. अखेर शनिवारपासून मच्छीमार महिलांना ससून डॉकमध्ये पुन्हा मासेविक्री करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
पावसाळा सुरू झाल्यामुळे राज्य मत्स्यव्यवसाय विभागाने 2 जून रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टला पत्र पाठवून मासेमारी बंदीसोबत ससून डॉकमध्ये मासेविक्रीला प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे ससून डॉकमध्ये मासे विक्री, मासे वाहनातून उतरवणे तसेच इतर सर्व कामांसाठी बंदी घालण्यात आली. सरकारने ही अन्यायकारक बंदी उठवावी आणि कोळी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष शिंदे आणि उपविभागप्रमुख कृष्णा पोवळे यांनी राज्य सरकारकडे पत्र पाठवून केली होती. तसेच पावसाळय़ात मासळी विकणे चुकीचे असेल तर सरकार पंचतारांकित हॉटेल्स, उपाहारगृहे आणि इतर मासळी बाजारात मासळी विक्री आणि पुरवठय़ावर बंदी घालणार का? ससून डॉकमध्ये काम करणाऱया हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला होता. अखेर शिवसेनेच्या दणक्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाकडून ससून डॉकमध्ये पुन्हा मासे विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.
हा आमच्या पारंपरिक हक्काचा विजय
ससून डॉकमध्ये पुन्हा एकदा मासेविक्रीला परवानगी मिळाल्याबद्दल कोळी बांधवांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. ही केवळ परवानगी नसून हा आमच्या पारंपरिक हक्काचा विजय आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



























































