
मणिपूरमध्ये अरम्बाई टेंगोल या मैतेई संघटनेचे नेते करन सिंह यांना 2023 मध्ये हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केली. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला. इम्फाळमध्ये आंदोलकांनी अनेक गाडय़ा पेटवून दिल्या असून सुरक्षा दलांवरही दगडफेक झाली. अनेक आंदोलकांनी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
दरम्यान, कुकी आणि मैतेई समुदायामध्ये 3 मे 2023 पासून आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. दोन वर्षांत या संघर्षातून झालेल्या हिंसाचारात तब्बल 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून दीड हजारांहून अधिक जखमी झाले, तर 70 हून अधिक लोकांनी स्थलांतर केले. आतापर्यंत 6 हजारांहून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
राज्यपालांनी घेतली तातडीची बैठक
हिंसाचारानंतर मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदारांनी बैठकीदरम्यान केली. यावेळी सुरक्षा सल्लागार, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे आयुक्त, राज्यपालांचे सचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, एका भाजप आमदाराने मैतेई नेते करन सिंह यांच्यासह पाचजणांना अटक केल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
राजभवनची सुरक्षा व्यवस्था वाढवली
संतप्त आंदोलकांनी इम्फाळ पश्चिमेकडील खुरई लामलोंग येथे एक बस पेटवून दिली. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून तिचा केवळ सांगाडा उरला. तर क्वाकेथेल येथे गोळीबाराचा आवाज ऐकू आला; परंतु गोळीबार कुणी केला याबाबत कळू शकले नाही. तीन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून शनिवारी रात्री उशिरा सुरू झालेला हिंसाचार आज सकाळीही कायम होता. त्यामुळे राजभवनकडे जाणाऱया रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली. केंद्रीय सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकडय़ा तैनात करण्यात आल्या. राजभवनपासून 200 मीटर अंतरावर आंदोलकांनी जाळपोळ केली. आंदोलन आणखी चिघळू नये म्हणून सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दोन वर्षांपासून हिंसाचार, हत्या, बलात्कार, स्थलांतराचा सामना – प्रियंका गांधी
मणिपूरमधील हिंसाचारावरून खासदार प्रियंका गांधी यांनी आज एक्सवरून पोस्ट करत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या तडाख्यात सापडले आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथील लोक हिंसाचार, हत्या, बलात्कार आणि पलायनाचा सामना करत आहेत. शेकडो जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. येथे पेंद्राचे प्रशासन असूनही अजूनही शांतता प्रस्थापित करता आलेली नाही याचे नेमके कारण काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला आहे त्याच स्थितीत का सोडले आहे, असे सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केले आहेत. पंतप्रधान आजतागायत मणिपूरमध्ये गेले नाहीत. तसेच कुठल्याही लोकप्रतिनिधीलाही भेटलेले नाहीत. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्नही केलेले नाहीत. पंतप्रधानांचे हे वर्तन बेजबाबदारपणाचे आणि संवेदनाहीन आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. देशात शांतता आणि सुरक्षा व्यवस्था राखणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे. त्यापासून मोदी मागे हटत आहेत, असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला आहे.
हिंसाचारानंतर सरकारने पाच दिवसांसाठी 5 जिह्यांतील इंटरनेट आणि मोबाइल सर्व्हिस बंद केली आहे. इम्फाळ पश्चिम आणि पूर्व, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर यांचा यात समावेश आहे.




























































