
इस्रायलच्या अण्वस्त्रांबद्दलची संवेदनशील माहिती आमच्या हाती लागली आहे. त्यांच्या न्युक्लियर फायलींचे भांडारच आम्हाला सापडले आहे, असा दावा इराणने केला आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील शत्रुत्व आणखी वाढण्याची शक्यता असून मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आणखी वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्लेही केले आहेत. तसेच सायबर युद्धही सुरू आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हीजनवरून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात इस्रायलच्या अण्वस्त्रांबद्दलची संवेदनशील माहिती आम्हाला मिळाली आहे, असा दावा करण्यात आला आहे. अहवालात गुप्त दस्तावेज, छायाचित्रे आणि व्हिडीओ यांचाही समावेश आहे.