निवृत्त नौदल अधिकाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा, जमीन खरेदीत फसवणूक

जमीन खरेदीत तब्बल 1.35 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱयाला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. तैयब हैदर सिद्धिकी असे या निवृत्त अधिकाऱयाचे नाव आहे. न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल पीठाने सिद्धिकी यांना एक लाख रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

नौदल अधिकारी होण्याचे प्रशिक्षण देणारी अॅकॅडमी सुरू करण्यासाठी कर्जतसह अन्य तीन ठिकाणी जमीन विकत घेतल्याचा बनाव करण्यात आला. शेतकऱयांना जमीन खरेदीचे पैसे देण्याचे सांगून तक्रारदारांकडून 1.35 कोटी उकळण्यात आले. सातबारावर नाव नमूद न झाल्याने ही फसवणूक उघडकीस आली. यात सिद्धिकी व अन्य एका आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. जमीन व्यवहाराचे पैसे दुसऱ्या आरोपीला देण्यात आले. त्याला जामीन मंजूर झाला आहे. माझा या गुह्यात काहीच सहभाग नाही. मला अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी सिद्धिकी यांनी केली होती.