
एका लोकलमधून साधारण साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. परंतु गर्दीच्या वेळी पिक अवरमध्ये लोकलमधून पाच ते सहा हजार प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे ओव्हरलोड झालेली ट्रेन मुंब्रा येथील धोकादायक वळणावर एका बाजूला झुकते असे रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी सांगितले. मुंब्र्याच्या धोकादायक वळणाबद्दल आम्ही रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, आज झालेले मृत्यू हे रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे बळी आहेत, असा संतापही देसाई यांनी व्यक्त केला.
शिवसैनिकांची रुग्णालयात धाव
मुंब्रा दुर्घटनेतील जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच शिव आरोग्य सेनेची ठाणे जिल्हा टीम तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. माळगावकर यांची भेट घेऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना भेटून उपचारासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित शिव आरोग्य सेनेकडून सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुइँबर, ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे, विधानसभा संघटक चंद्रकांत विधाटे, अजित माने, विलास उतेकर, शंकर राणे, माधुरी ठाकरे, शाखाप्रमुख सचिन खर्डिले आदी उपस्थित होते. दरम्यान कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख उपनेते गुरुनाथ खोत, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई यांनीही कळवा रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.
वर्षभरापासून जीएमने भेटीसाठी वेळच दिली नाही
रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आम्ही मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे भेटीची वेळ मागत आहोत. मात्र गेल्या वर्षभरात जीएमने भेटीची वेळच दिली नाही, असा आरोप प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी दिला. आता जर त्यांनी वेळ दिली नाही तर आम्ही थेट आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
पुष्पक एक्स्प्रेसचा काही संबंध नाही
सुरुवातीला पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवासी कोसळले अशी माहिती सांगण्यात येत होती. मात्र या घटनेचा पुष्पक एक्स्प्रेसशी काहीही संबंध नाही. परस्पर विरोधी दिशेने आलेल्या लोकलमधील प्रवाशांचा अपघात झाला, अशी माहिती मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नील निला यांनी दिली.
मुंब्यातील भीषण अपघाताला रेल्वेच जबाबदार
मुंब्यातील भीषण अपघाताला रेल्वेच जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. दिव्यावरून मुंब्याला येताना एक खतरनाक टर्न आहे. त्यात रेल्वेचा रॅक तिरका होतो, मुंब्रा पार केल्यावर कळव्याला जाताना बोगद्यातले तीन पोल अतिशय जवळ आहेत. त्यावर धडकून हजार तरी लोक मेले असतील. मागणी करूनही हे पोल बाजूला केले जात नाहीत. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये मुंगी शिरायलाही जागा नसते. रेल्वे प्रशासनाने एसी लोकल वाढवल्या, पण सर्वसामान्य लोकांच्या लोकल वाढवल्या का? ज्यांना एसी लोकल परवडत नाही ते मरत आहेत. रेल्वे खाते कधी सुधारणार, असा सवालही त्यांनी केला.































































