
आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी, वाळुंजनगर भागात गेल्या तीन महिन्यात बिबट्याने सात जणांवर हल्ला केल्याची घटना घडली. परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात शुक्रवारी मादी बिबट्या आणि बछडा एकाचवेळी जेरबंद झाला. तर एक बछडा अजूनही या भागात मोकाट असल्याने बिबट्याची दहशत कायम आहे.
आंबेगाव तालुक्यात माली काही वर्षात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बिबट्या आणि मानवातील संघर्षही वाढत आहे. खडकवाडी, वाळुंजनगर या भागातही बिबट्याचा मुक्त संचार असून तीन महिन्यात येथे बिबट्याने 7 माणसांवर हल्ला केला. 4 मे रोजी वाळुंजनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील रस्त्यावर जाताना मंगेळ वाळुंज यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने शाळेजवळील शेतात पिंजरा लावला होता. 12 जून रोजी या पिंजऱ्यात बिबट्या मादी आणि बछडा जेरबंद झाला. त
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल निलम चव्हाण, वनरक्षक योगेश निघोट, रेस्क्यू मेंबर मनोज तळेकर, शीघ्र कृती दल अवसरी/गावडेवाडी मेंबर चारूदत्त बाबळे, धर्मेंद्र ढगे, बापू वाघ, हर्षल गावडे, दीपक भोंडवे, प्रज्वल आवरी, प्रकाश हिले, कुणाल गावडे, ऋषिकेश विधाटे, शुभम शिस्तार, महेंद्र दाते, शुभम येवले यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्या मादी व बछड्याला ताब्यात घेऊन अवसरी वन उद्यानात पाठवले आहे.
जुन्नर वन विभागात आज बिबट्या मादी व बछडा एकत्र जेरबंद होण्याची ही पहिलीच घटना असावी. एकाच पिंजऱ्यात एकाच वेळेस एकच बिबट्या अथवा एखादा वन्यप्राणी जेरबंद होत असतो, मात्र या घटनेत मादी व बछडा दोन्ही एकत्र जेरबंद झाल्याने ही घटना दुर्मिळ आहे. या घटनेचा वन्यजीव अभ्यासकांना अभ्यास करण्यासाठीही चांगली पर्वणी असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.