अल्पवयीन पीडितेला प्रियकरासोबत राहायचे होते; हायकोर्टाचे निरीक्षण, बलात्काराचा आरोप असलेल्याला जामीन

अल्पवयीन पीडितेला प्रियकारासोबत राहायचे होते. तसा तिने जबाबही दिला आहे, असे नमूद करत बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

नितेश पवार असे या आरोपीचे नाव आहे. रबाळे पोलिसांत त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 2023 मध्ये त्याला अटक झाली. अॅड. भाग्यशा कुरणे यांच्यामार्फत त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली.

पीडिता अल्पवयीन आहे;. मात्र तिच्यावर बळजबरी करण्यात आली याचा एकही ठोस पुरावा नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने पवारला पाच हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण

z अल्पवयीन पीडितेचे व पवारचे प्रेमसंबंध होते. तेव्हा पीडिता 15 वर्षांची होती. पवार 21 वर्षांचा होता. पीडिता पवारसोबत पाच महिने राहिलीदेखील होती. मात्र तिच्या वडिलांनी पोलिसांत पवारविरोधात तक्रार केली. पोलिसांनी पवारला अटक केली. पवारसोबत स्वेच्छेने राहिली होती. आमचे प्रेमसंबंध आहेत, असा जबाब तिने पोलिसांना दिला. पीडिता अल्पवयीन असल्याने तिचा जबाब ग्राह्य धरला जाणार नाही, असे नमूद करत सत्र न्यायालयाने पवारला जामीन नाकारला. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

अन्य कोणता गुन्हा करू नकोस

z पवारने पुराव्यांशी छेडछाड करू नये. साक्षीदारांना आमिष दाखवू नये. तसेच खटला प्रलंबित असताना अन्य कोणता गुन्हा करु नये यासह अन्य अटींवर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.