
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक शाळा काहीना काही तरी वेगळे करण्याचे प्रयत्न करतात. मात्र वसईच्या एका पित्याने आपल्या बेट्याला चक्क रोल्स रॉईसने शाळेत नेले. यासाठी 20 हजार रुपये रोकडे मोजून या पित्याने ही कार काही तासांसाठी भाड्याने आणली होती. त्यामुळे वसईच्या रेयाँशचा शाळेचा पहिला दिवस यादगार ठरला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले नवीत भोईर यांनी आपल्या नवसाच्या पोरासाठी हटके केलेल्या रोल्स रॉईस सफारीची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
वसई पूर्वेतील कामण खिंडीपाड्यात राहणारे नवीत भोईर यांचा 2015 मध्ये शुभांगी यांच्याशी विवाह झाला होता. मात्र अनेक वर्षांनंतरही त्यांना मुलबाळ होत नव्हतं. उपास-तपास, नवस केल्यानंतर 2021 मध्ये रेयाँशचा जन्म झाल्याचे नवीत भोईर यांनी सांगितले. जन्मानंतर रेयाँश जवळपास एक महिना अतिदक्षता विभागात होता. त्यामुळे त्याला आम्ही फुलासारखंच जपत असून तो घरात सर्वांचाच लाडका आहे. चार वर्षांच्या रेयाँशला वसई पूर्व, फादरवाडी येथील विद्या विकासिनी या शाळेत ज्युनियर केजीसाठी प्रवेश घेतला. शनिवारी त्याचा शाळेचा पहिला दिवस असल्याने काहीतरी हटके करण्याचा निर्धारच नवीत आणि त्यांच्या घरच्यांनी केला होता.
फुलांनी गाडी सजवली…
नवीत यांनी 20 हजार रुपये देऊन रोल्स रॉईस गाडी भाड्याने आणली. तिला फुलांनी सजवली. त्यानंतर भोईर, त्यांची पत्नी शुभांगी, सासरे, रेयाँश व भावाचा मुलगा अद्वित यांना सोबत घेऊन या कारने विद्या विकासिनी शाळा गाठली. रेयाँशचा हा आगळावेगळा थाट पाहून रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले अनेक पालक कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते. रेयाँशही आनंदाने सर्वांना हाय-बाय करत होता. या अनोख्या प्रवेशाची दिवसभर सर्वत्र चर्चा सुरू होती.
सामाजिक कार्यात अग्रेसर
नवीत भोईर हे प्राथमिक शिक्षक असले तरी त्यांची वडिलोपार्जित खूप शेतीवाडी आहे. शिक्षिकी पेशा सांभाळून ते रेयाँश प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्यही करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांनी तब्बल 43 किलो वजनाचा केक बनवून आणला होता. मात्र अहमदाबाद विमान दुर्घटना घडल्याने याचे सामाजिक भान ठेवून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही.