
एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक देणींच्या मुद्यावर कामगार संघटना राज्य सरकारविरोधात एकत्रित लढा देण्याच्या पवित्र्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी मुंबईत संयुक्त कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सरकारने एसटी कामगारांच्या थकीत देणी व इतर प्रश्नांबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वी केलेल्या घोषणादेखील फसव्या असल्याचे उघड झाल्याने राज्यभरातील एसटी कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे कामगार संघटना आता आपल्या हक्कांसाठी एकत्रित लढा देणार आहेत. या अनुषंगाने मंगळवारी मुंबई सेंट्रल येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या सर्व संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त कृती समितीने केले आहे. बैठकीकडे राज्यातील संपूर्ण एसटी कामगारांचे लक्ष लागले आहे.