
सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. या युद्धाला जबाबदार कोण, अशी चर्चा जगभरात होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर खापर फोडत त्यांच्यामुळेच आपल्याला आजच्या या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. रशिया आज G 8 मध्ये असता तर ही परिस्थिती ओढवली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बराक ओबामा आणि जस्टिन ट्रूडो प्रशासनावर रशियाला G8 सदस्य राष्ट्रांमधून वगळल्याबद्दल टीका केली. रशियाला यातून वगळल्यानंतर आता ते G7 बनले आहे. रशियाला यातून वगळणे ही एक गंभीर चूक होती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच आपण अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असतो तर रशिया-युक्रेन युद्ध झाले नसते, या दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
G7 पूर्वी G8 होता. सुमारे नऊ वर्षांपूर्वी, रशियाला यातून वगळण्यात आले होते, ही एक गंभीर चूक होती. त्यावेळी, बराक ओबामा आणि जस्टिन ट्रूडो सारख्या नेत्यांना रशियाला यात सहभागी करून घ्यायचे नव्हते. मात्र, त्यावेळी रशिया टेबलावर राहिला असता, तर कदाचित आज आपल्याला युद्धाला तोंड द्यावे लागले नसते. जर मी 4 वर्षांपूर्वी अध्यक्ष असतो, तर आत्ता आपल्याला युद्धाला तोंड द्यावे लागले नसते, असा दावाही त्यांनी केला.
रशियाचा सदस्य म्हणून समावेश झाल्यानंतर G7 तात्पुरते G8 बनले, परंतु 2014 मध्ये क्रिमियाच्या विलयीकरणानंतर आणि युक्रेनमध्ये सुरुवातीच्या घुसखोरीनंतर देशाला बाहेर काढण्यात आले. या घडामोडींनी रशिया- युक्रेन युद्धाचा पाया घातला, असेही ते म्हणाले. ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा शनिवारी फोनवर संपर्क झाला आणि दोघांनीही इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष संपला पाहिजे यावर सहमती दर्शविली.