वन जमीन लाटल्याचा ठपका, कंत्राटदार जे. एम. म्हात्रेंवर ईडीची छापेमारी

वनजमीन हडप करीत तीच जमीन राष्ट्रीय महामार्गाला विकून तब्बल 42 कोटींचा मोबदला घशात घातल्याप्रकरणी पनवेलमधील प्रख्यात कंत्राटदार आणि नुकतेच शेकापमधून भाजपमध्ये गेलेले जे. एम. म्हात्रे हे ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीच्या पथकाने त्यांच्या पनवेलमधील निवासस्थान तसेच कार्यालयावर धाडी टाकत काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. मात्र या प्रकरणावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

पनवेल तालुक्यातील वहाळ गावात गट नं. 427/1 (41.70 हेक्टर) आणि गट नं. 436/1 (110.60 हेक्टर) जमीन आहे. यातील गट नं. 436/1 मधील 1.86 हेक्टर जमीन म्हात्रे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विक्री केली आहे. यासाठी त्यांनी 42.40 कोटींचा मोबदला घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत 5 सप्टेंबर 2024 रोजी तक्रार दाखल करण्यात
आली होती, अशी माहिती उरण येथील वन परिक्षेत्र अधिकाऱयांनी दिली आहे. याच प्रकरणात ईडीने पनवेलमधील दोन ठिकाणी आणि मुंबईमधील दोन ठिकाणी छापे टाकले आहेत.

आर्थिक घोटाळय़ातील साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू

या कारवाईवेळी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. म्हात्रे यांच्या निवासस्थान परिसरात कुणालाही फिरकू दिले जात नव्हते. पनवेल पोलिसांनीदेखील या कारवाईविषयी माहिती देण्यास नकार दिला. ईडीने या आर्थिक घोटाळय़ातील साखळी
उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या ईडीकडून जमिनीचे मूळ दस्तऐवज, आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती, तसेच तात्कालिक व्यवहारांमागील संगणकीय डेटा जप्त केला जात आहे.