
मध्य प्रदेशमधील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांडमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान या हत्येच्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याआधी राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिने हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती. आता राजाच्या हत्येसाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचाही तपास लागला आहे. या हत्याकांडचा तपास ज्या एसआटीकडे सोपवण्यात आला होता त्यांनी आता हत्येत वापरलेले दुसरे हत्यार जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीने शिलाँगच्या वायसोडोंग धबधब्यांजवळील एका खोल दरीतून हत्येत वापरलेले दुसरे शस्त्र जप्त केले. हा स्टीलचे हँडल असलेला चाकू आहे. पोलिसांनी गुन्ह्याच्या ठिकाणी पुन्हा तपास केला. त्या दरम्यान पोलिसांना हे शस्त्र सापडले. मात्र पहिल्या शस्त्राचा पोलीस अद्यापही तपास करत आहेत. याशिवाय, या प्रकरणात आणखी अनेक खुलासे झाले.
ईस्ट खासी हिल्सचे एसपी विवेक सैम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. राजाचा मृत्यू तीन वार केल्यामुळे झाला. पहिला वार विशाल (उर्फ विकी), दुसरा आकाश आणि शेवटचा आनंद यांनी केला. राजाच्या डोक्यावर वार करताना सोनम समोर उभी होती. पहिल्याच वारानंतर राजा जोरात ओरडला तेव्हा सोनम तिथून पळून गेली होती. यानंतर, तिन्ही आरोपींनी मिळून राजाचा मृतदेह दरीमध्ये फेकून दिला. अशी माहिती सैम यांनी दिली.
राजा रघुवंशी हत्याकांड’ प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून एसआयटीने गुन्हेगारी दृश्यांची पुनरावृत्ती केली, या प्रक्रियेत, विशाल, आकाश, आनंद आणि सोनम या चार आरोपींनी हत्येच्या प्रत्येक टप्प्याची पुनरावृत्ती केली. हा संपूर्ण घटनाक्रम साक्षीदारांच्या उपस्थितीत व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला गेला. घटनेच्या पुनरावृत्तीमुळे हत्येबाबत तपास करणे अधिक सोपे झाले असे विवेक सैम म्हणाले.
सर्वच आरोपींकडून गुन्ह्याची कबुली
राजा आणि सोनम रघुवंशी गुवाहाटीमार्गे मेघालयात पोहोचले. 23 मे रोजी दोघेही बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीमध्ये सापडला. तर तिथून जवळपास 1200 किलोमीटर दूर उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे सोनम हिने पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि अन्य तीन कॉन्ट्रॅक्ट किलरलाही बेड्या ठोकल्या. पोलीस चौकशीदरम्यान सोनमसह सर्वच आरोपींनी गुन्हा कबूल केला.
राजा रघुवंशीच्या हत्येला काळ्या जादूचे वळण, वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती