कैद्यांचे ससूनमधील ‘मेडिकल टुरिझम’ बंद करणार! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली जेलमधून बाहेर येणाऱ्या कैद्यांचा गैरवापर थांबविण्यासाठी आता पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’ कार्यवाही होणार आहे. ससून प्रशासनाच्या मदतीने अशा कैद्यांची माहिती घेतली जाईल. या माध्यमातून कैद्यांचे ‘मेडिकल टुरिझम’ बंद केले जाणार असून, त्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या जातील, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. केवळ अत्यावश्यक आणि वैद्यकीय गरज असल्यासच जेलमधील कैद्यांना येथे उपचार मिळावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ससून रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी स्थानिक आमदार सुनील कांबळे, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखिल पिंगळे, उपायुक्त स्मार्तना पाटील, ससूनचे अधीक्षक यल्लप्पा जाधव, बांधकाम विभागाच्या कीर्ती कुंजीर आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना आयुक्त कुमार म्हणाले, ‘ससूनमध्ये उपचार घेण्याच्या नावाखाली काही गुन्हेगार दीर्घकाळ वास्तव्य करत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. यापैकी काही आरोपींनी रुग्णालयातून पळ काढल्याच्याही घटना घडल्या आहेत. ‘आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी ससूनमधून सुरू असलेल्या तथाकथित ‘मेडिकल टुरिझम’वर चाप बसवण्यात येईल. अत्यावश्यक गरज असेल आणि केवळ वैद्यकीय कारणांमुळेच एखादा कैदी जेलमधून ससूनमध्ये आणला जाईल. मात्र, हा मार्ग मोकळेपणासाठी वापरता येणार नाही. अशा प्रकारांवर सर्जिकल स्ट्राईक केली जाईल आणि संबंधितांची उचलबांगडी केली जाईल. ससूनमधील चौकीचा चांगला फायदा होईल. रुग्णालयातील पोस्टमार्टम रिपोर्ट आणि एमएलसी रिपोर्ट संबंधित पोलीस ठाण्याला लवकरात लवकर पाठवले जातील. यामुळे वेळ वाचेल आणि कारवाई तत्काळ करता येईल. या वेळी आमदार सुनील कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पीआय दर्जाचा अधिकारी देणार
ससून रुग्णालयात गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. अनेकदा मारहाणीचे प्रकार घडतात. या सर्व पाश्र्वभूमीवर बोलताना आयुक्त म्हणाले, ‘डॉक्टर, रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी ही चौकी उपयुक्त ठरणार आहे. चौकीमध्ये लवकरच पीआय दर्जाचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील. परिसरात शिस्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक असेल.