स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधूंच्या बलिदानाची गाथा उलगडणार, विलेपार्ल्यात रविवारी ‘गीतवीर विनायक’

पुणेकरांवर अमानुष अत्याचार करणारा ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध क्रांतिवीर चापेकर बंधूंनी 22 जून 1897ला गणेश खिंडीत केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तिन्ही चापेकर बंधू हसत फासावर गेले. या घटनेच्या स्मृती येत्या 22 जून रोजी उलगडणार आहेत. निमित्त आहे सावरकर चरित्र गायक सतीश भिडे यांच्या ‘गीतवीर विनायक’ या कार्यक्रमाचे. चापेकर बंधूंचे पणतू प्रशांत चापेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा संघर्ष विद्यार्थ्यांना कळावा यासाठी ‘गीतवीर विनायक’ हा सावरकरांच्या संघर्षमय जीवनावर आधारीत कार्यक्रम सतीश भिडे गेल्या अनेक वर्षांपासून विनामानधन करत आहेत. येत्या रविवारी 22 जून रोजी या कार्यक्रमाचा 3 हजार 170 वा प्रयोग विलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पेंद्रात सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
ज्येष्ठ गायिका चित्रा जोशी, वृंदा मोडक, छाया खाडिलकर, वैभवी गोखले, सरोज डोंगरे, विद्या पराडकर, तबलावादक जयेश ठक्कर, तन्मय रिसबूड या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मीनाक्षी पडसळगीकर, विलासराव पिंगळे व संघमित्रा भिडे या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रा. केशवराव परांजपे यांनी दिली.