काव्या मारनच्या अडचणीत वाढ, ‘सनरायजर्स हैदराबाद’ संघ हातातून जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?

इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या हंगामचे विजेतेपद पटकावणाऱ्या ‘सनरायझर्स हैदराबाद’ संघाची चर्चा होते तेव्हा संघमालक काव्या मारन हिचा चेहरा सर्वोसमोर येतो. हैदराबादचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी काव्या मारन मैदानात उपस्थित असते. संघाच्या यश, अपयशावर ती आपली प्रतिक्रियाही व्यक्त करते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होत असतात. ‘ब्यूटी विथ ब्रेन’ अशी उपमा तिला दिली जाते आणि यामुळे तरुणांमध्येही तिची विशेष चर्चा होते. आता याच काव्या मारन हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘सन नेटवर्क’वरून कुटुंबात सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे काव्या संकटात सापडली असून तिच्या हातातून हैदराबाद संघाची मालकी जाण्याची शक्यता आहे.

दक्षिणेकडील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘सन नेटवर्क’चे मालक आणि काव्या मारन हिचे वडील कलानिधी मारन यांच्यावर मनी लॉण्डरिंगचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण कलानिधी यांचे बंधू आणि माजी खासदार दयानिधी मारन यांनीच उजेडात आणले आहे. या प्रकरणी त्यांनी कलानिधी यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली असून कंपनीची भागिदारी (शेअरहोल्डिंग) 2003 मध्ये असलेल्या स्थितीत परत आणण्याची मागणी केली आहे.

2003 मध्ये मारन कुटुंब आणि करुणानिधी कुटुंबामध्ये ‘सन नेटवर्क’मध्ये समसमान भागिदारी होती, मात्र त्यानंतर यात बदल झाला. कंपनीच्या फंडचा चुकीचा वापर करून Sun Direct TV, Sun Pictures, FM चॅनल आणि आयपीएल टीम Sunrisers Hyderabad सारख्या कंपन्या उभ्या करण्यात आल्या असा आरोप होत आहे.

न्यायालयाने 2003 प्रमाणे भागिदारी कायम ठेवण्याचा निर्णय दिल्यास ‘सन नेटवर्क’च्या मालकी हक्कांमध्येही बदल होईल. याचा थेट परिणाम ‘सनरायझर्स हैदराबाद’ संघावरही होईल. अशा स्थितीत बीसीसीआयला मध्यस्थी करून निर्णय घ्यावा लागू शकतो किंवा ‘सन टीव्ही’ला संघ विकावा लागू शकतो. असे झाल्यास आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्याला हजर राहणाऱ्या काव्या मारनला हैदराबाद संघाची मालकी गमावू लागू शकते. तसेच झाल्यास हैदराबादचे चाहते आणि काव्याचे हितचिंतक यांनाही धक्का बसेल.

23 हजार कोटींचे मार्केट कॅप

दरम्यान, कलानिधी मार हे ‘सन टीव्ही नेटवर्क’चे मालक आणि चेअरमन, तसेच ‘सन ग्रुप’चे संस्थापक आहेत. सन टीव्ही नेटवर्कचे 37 टीव्ही चॅनेल आहेत. यात 26 स्टॅडर्ड डेफिनेशन आणि 11 हाय डेफिनेशन चॅनेलचा समावेश आहे. तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बांगला, हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये ही चॅनेल्स कार्यरत आहेत. 23 हजार कोटींचे मार्केट कॅप असलेल्या या कंपनीने 2023-24 मध्ये कंपनीने 4200 कोटी रुपये कमावले होते. यापैकी 1650 कोटी रुपये नेट प्रॉफिट होता.