रत्नागिरीत मच्छीमार नौकेला आग; बोलेरोही जळून खाक

शहरानजीक भाट्ये येथील नौका बांधणीच्या कारखान्यात आज लागलेल्या आगीमुळे मासेमारी नौका आणि बोलेरो गाडी जळून खाक झाली. आग लागताच सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आग लागलेली बोट आसिफ जावेद वस्ता यांची मच्छीमार नौका होती. दुर्घटनेवेळी बोटीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आगीमुळे मच्छीमार नौकेचे जवळपास पाच से सात लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गॅस वेल्डिंग मशिनच्या माध्यमातून काम सुरू असताना अचानक नौकेने पेट घेतला. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. नौकेच्या बाजूला बोलेरो गाडी उभी होती. या गाडीनेही पेट घेतला आणि काही क्षणातच गाडीला आगीच्या महाकाय ज्वालांनी वेढले. आग लागताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.