
निवडणुकीत गोलमाल केल्याच्या आरोपावरून बांगलादेशचे माजी निवडणूक आयुक्त के. एम. नुरूल हुदा यांना अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी जनतेने नुरूल हुदा यांना बदडून काढले, गळ्यात खेटराची माळ घालून त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढण्यात आली, त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
बांगलादेशात 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप असून त्यासाठी तत्कालीन निवडणूक आयुक्त के. एम. नुरूल हुदा यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी हुदा यांच्यासह 24 जणांवर ढाक्याच्या शेर ए बांगला नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात माजी पंतप्रधान शेख हसीना, चार माजी पोलीस महानिरीक्षक, तीन माजी निवडणूक आयुक्त, माजी गृहमंत्री यांचाही समावेश आहे. आज या प्रकरणात नुरुल हुदा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नुरूल हुदा यांना पोलिसांनी अटक करण्यापूर्वीच जनतेने त्यांचा ताबा घेतला. त्यांना मारहाण करण्यात आली. हुदा यांच्या गळ्यात खेटरांची माळ घालून त्यांना पोलीस ठाण्यापर्यंत आणण्यात आले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.