
क्रिकेट विश्वातील एक निष्कलंक आणि सज्जन व्यक्तिमत्त्व असलेल्या हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू दिलीप दोषी यांच्या निधनाने अवघे क्रिकेट जगत स्तब्ध झाले आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना दोषी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
हिंदुस्थानी क्रिकेटसाठी 4 वर्षे क्रिकेट खेळलेल्या दोषी यांनी 33 कसोटीत 114 विकेटही टिपल्या होत्या. त्यांनी 6 वेळा डावात पाच विकेट टिपले आहेत. काल लंडनमध्येच दोषी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली. दोषी यांच्या निधनाचा धक्का बीसीसीआयच नव्हे, तर अवघ्या क्रिकेट जगताला बसला. बीसीसीआयसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रवी शास्त्राrसह अनेक दिग्गजांनी त्यांच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा करत श्रद्धांजली वाहिली. दोषींसह खेळलेल्या रवी शास्त्राr म्हणाले, ते एक सज्जन व्यक्तिमत्त्व आणि अप्रतिम गोलंदाज होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. बिशन सिंह बेदीनंतर त्यांनी 1979 साली हिंदुस्थानी संघात पदार्पण केले आणि आपल्या चार वर्षांच्या छोटय़ाशा कारकीर्दीत 114 विकेट टिपले.
माजी कसोटीपटू सुनील जोशीने आपल्या ट्विटमध्ये भावना व्यक्त केल्या, अजूनही विश्वासच बसत नाही. गेल्या आठवडय़ातच त्यांच्याशी बोललो होतो आणि ते बरे वाटत होते. त्यांच्या निधनाने खूप दुःखी झालोय. ते मैदानावरचे महान खेळाडू होते आणि मैदानाबाहेरील सज्जन व्यक्तिमत्त्व. त्यांचे हे व्यक्तिमत्त्व सदैव स्मरणात राहील. महान फिरकीवीर अनिल पुंबळे, हरभजन सिंग, प्रज्ञान ओझा, पार्थिव पटेल या दिग्गजांनीही आपल्या भावना एक्सवर व्यक्त केल्या.
ते माझ्यावर खूप प्रेम करायचे
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही एक्सवर दिलीप दोषी यांना श्रद्धांजली वाहिली. तो म्हणाला, मी दिलीपभाईंना 1990च्या इंग्लंड दौऱयात सर्वप्रथम भेटलो होतो. तेव्हा त्यांनी सरावादरम्यान मला गोलंदाजी केली होती. ते माझ्यावर खूप जीव लावायचे आणि मीसुद्धा त्यांच्या भावनांचा सन्मान करायचो. मला त्यांची खूप आठवण येईल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
निवृत्तीनंतर दोषी लंडनवासी झाले
हिंदुस्थानी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर ते व्यवसायानिमित्त लंडनवासी झाले आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत तेथेच स्थायिक झाले. लंडनमध्ये ते एक यशस्वी उद्योजक बनले होते. व्यवसायानंतर त्यांचा जास्त वेळ लंडन, मुंबई आणि गुजरातमध्येच जात असे. त्यांच्या पश्चात पत्नी कलिंगी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नयन दोषीसुद्धा सरे आणि सौराष्ट्रसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे.
ये, तेला लूम नंबल क्या है…?
जावेद मियांदाद आणि दिलीप दोषी यांच्यात नेहमीच चकमक उडायची. मियांदादने दोषीविरुद्ध खूप धावा केल्या आहेत. तरीही दोघांची चकमक नेहमीच लक्षात राहील. मियांदाद नेहमीच मैदानात दोषींना चिडवायचा. एका कार्यक्रमात खुद्द गावसकरांनीच किस्सा ऐकविला. मैदानात आल्यावर मियांदाद दोषीला म्हणायचा, ये दिलीप, तेला लूम नंबल क्या है? अनेक वेळा मियांदादने हा प्रकार केला. आम्हाला नक्कीच काय प्रकार आहे ते कळतच नव्हता. दोन चेंडूंनंतर मियांदाद हा प्रश्न विचारत होता. एका शॉटनंतर मियांदादच्या या प्रश्नाने दोषी उखडला आणि त्याने विचारले, माझा रूम नंबर जाणून तुला काय करायचेय? तेव्हा मियांदाद म्हणाला, कारण मला तुझ्या रूमवर षटकार ठोकायचा आहे.