
माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक या गावातील तब्बल तीस एकर जमिनीवर क्रशरमाफियांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. करार संपला असतानाही काही स्थानिक बगलबच्च्यांना हाताशी धरून तेथे खडी क्रशिंगचा गोरखधंदा सुरूच ठेवला आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी न घेता डांबर आणि आरएमसी प्लांटदेखील थाटला आहे. ‘आर्या एण्टरप्रायजेस’ने हा कारनामा केल्याचे उघडकीस आले 5 असून बेकायदा क्रशिंग, डांबर 1 व आरएमसी प्लांट बंद करून बळकावलेली जमीन पुन्हा आमच्या ताब्यात द्यावी अशी मागणी मूळ मालकांनी केली आहे.
कोस्ते या गावात यतीन सावला, वर्षा शहा, प्रीती सावला, अंशल सावला, हर्षल सावला यांच्या माल कीची 30 एकर एवढी जमीन आहे. त्यापैकी दोन एकर जागेवर ‘गोल्डन स्टोन’ या नावाने खडी क्रशिंगचा व्यवसाय सुरू केला. यतीन सावला, प्रीती सावला कौशिक सावला, सतीश जगताप हे या कंपनीचे भागीदार आहेत. काही काळानंतर आर्थिक नुकसान व अन्य कारणांमुळे हा व्यवसाय पुढे चालवणे अशक्य झाले. त्यामुळे खडी क्रशिंगचा कारखाना ‘आर्या एण्टरप्रायजेस’ या कंपनीचे मालक मुग्धा पोळेकर व त्यांचे पती मंगेश पोळेकर यांना ऑगस्ट 2016 मध्ये चालवायला दिला. त्यासाठी तीन वर्षांचा करार करण्यात आला.
वीजपुरवठा सुरूच कोस्ते बुद्रुक या गावामध्ये गोल्डन स्टोन या नावाने सुरू केलेला व्यवसाय बंद होऊन अनेक वर्षे झाली. ‘आर्या एण्टरप्रायजेस’ बरोबरचा भाडेपट्टी करारदेखील 2 ऑगस्ट 2019 रोजी संपला. तरीही महावितरणच्या वतीने सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे चालू असलेल्या खडी क्रशिंग मशीनला वीजपुरवठा सुरूच आहे. हा वीजपुरवठा तत्काळ बंद करावा अशी मागणी ‘गोल्डन स्टोन’चे यतीन सावला यांनी अनेकदा केली. तरीही वीज तोडली नाही. महावितरणचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, असा सवाल सावला यांनी केला आहे.
करार संपण्यापूर्वीच एप्रिल 2019 मध्ये ‘गोल्डन स्टोन’ कंपनीने त्यांच्याकडे असलेली 52 लाख रुपये किमतीची मशिनरी ‘आर्या एण्टरप्रायजेस’ कंपनीला विकली.
मशिनरी दुसरीकडे स्थलांतरित करून आमची ३० एकर जमीन परत ताब्यात द्या अशी लेखी मागणी यतीन सावला यांनी वारंवार केली, पण पोळेकर दाम्पत्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
सावला यांनी यासंदर्भात ग्रामपंचायत, तहसीलदार 2 कार्यालयापासून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत अनेकांकडे निवेदने दिली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही.































































