गोल्डन अवर्समध्ये तत्काळ रक्तपुरवठा, मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या तत्परतेने वाचला जीव

 

अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेप्रसंगी किंवा अपघात वा एखाद्या दुर्दम्य आजारात रक्ताची गरज भासते तेव्हा एकच धावपळ उडते. अशा वेळी अनेकदा रक्तासाठी जंग जंग पछाडावे लागते. परंतु गोल्डन अवर्समध्ये तत्काळ रक्ताचा पुरवठा करून मीनाताई ठाकरे रक्तपेढीने एक जीव वाचवला. रक्ताचा प्रत्येक थेंक आशेचा एक नवा किरण ठरतो हे पुन्हा एकदा दिसले. मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या या सामाजिक जाणिवेला मिल्लत रुग्णालयाने सलाम केला असून आभार मानणारे पत्र पाठवले आहे.

एका महिलेला रक्ताची तत्काळ गरज भासली. 15 रक्तपिशव्या 26 पीपीएफ, 4 सीआरहाओ, 4 एसडीएफ यांची गरज असल्याचे कळताच मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या कर्मचाऱयांनी तत्परता दाखवत तत्काळ रक्तपुरवठा होण्याच्या दृष्टीने अचूक नियोजन केले. त्यामुळे संबंधित महिलेचे प्राण वाचू शकले. या महिलेच्या कुटुंबियांनीही मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे आभार मानले आहेत.

एक विश्वास आणि जीवनदान

मीनाताई ठाकरे रक्तपेढी म्हणजे एक आशा, एक विश्वास आणि जीवनदान असे अतूट समीकरण आहे. रक्तपेढीच्या टीमने तत्काळ रक्तपुरवठा केल्याने एक जीव वाचवला, अशी भावना मिल्लत रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तल्हा धक्का यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.