श्री दत्त मंदिरात हंगामातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न

>> संदीप आडसूळ, शिरोळ

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज दुपारी एक वाजता संपन्न झाला. दुपारची वेळ व ज्येष्ठ अमावास्या, यामुळे भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी ‘दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, अशा जयघोषात भक्तांनी मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली.

काहीकाळ उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पुन्हा एकदा हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी एक वाजता चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. भाविकांनी ‘दिगंबरा दिगंबरा’, ‘श्री गुरुदेव दत्त’चा गजर करीत स्नानाचा लाभ घेतला.

दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्याने सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज आदी ठिकाणांहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली. भाविकांची गर्दी लक्षात घेता, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानमार्फत जादा सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.