
>> अनिल हर्डीकर
कांचनची प्रत्येक भेट शन्नांना प्रिय वाटे. कारण त्यांच्या गप्पांमध्ये नवीन वाचलेली पुस्तके, पाहिलेले चित्रपट, क्रिकेटची मॅच, त्याला सुचलेल्या भन्नाट कल्पना असा खजिना असायचा. कांचन नायक हा एकेकाळचा अनेक यशस्वी मराठी चित्रपटांचा दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध लेखक शन्ना नवरे यांच्या रसिक दोस्तान्याबद्दल …
कांचन नायक हा एकेकाळचा अनेक यशस्वी मराठी चित्रपटांचा दिग्दर्शक. त्याचा आणि सुप्रसिद्ध लेखक शन्ना नवरे यांचा दोस्ताना होता. कांचन हुशार तसाच रसिकदेखील! अनेक गोष्टींत त्याला गती. डोक्यात अनेक अफलातून कल्पना. बघावं तेव्हा तो सुखी आणि समाधानी! एकदा शन्नानी विचारलं तर म्हणाला, “मी व्यवहाराशी कधी संबंध ठेवत नाही. मला मी हवा असतो तसा असते’’
कमालीचा लहरी असलेला कांचन शन्नांना कधी वरचेवर भेटे नाहीतर महिन्यामहिन्यात भेट नाही. शन्ना विचारत, “काय रे, तुला कधी तरी मला साधा फोनही करावासा वाटत नाही?’’
कांचन म्हणे, “वाटतं, पण मग वाटतं काम नसताना उगाच फोन करून का त्रास द्यावा?’’
“त्रास कसला? तुला माझी आठवण आहे हे कळण्यासाठी तरी…’’ शन्ना म्हणत.
“यापुढे लक्षात ठेवेन’’ असं म्हणून कांचन विसरून जायचा.
कांचनची प्रत्येक भेट शन्नांना प्रिय वाटे. कारण त्याच्या गप्पांमध्ये नवीन वाचलेली पुस्तके, पाहिलेले चित्रपट, क्रिकेटची मॅच, त्याला सुचलेल्या भन्नाट कल्पना असा खजिना असायचा.
एकदा कांचनचा पुण्याहून फोन खूप दिवसांनी आला.
“काही कामासाठी चार-पाच दिवस मुंबैला येतोय. जमल्यास या रविवारी तुमच्याकडे येईन. जेवून बिवून संध्याकाळी निघेन.’’
“जमल्यास वगैरे नको नक्की ये. तुझ्यासाठी घरी राहतो. चार महिन्यांत भेट नाही आपली.’’ शन्ना म्हणाले.
“ओके सर, नक्की येतो. बरोबर सकाळी दहा वाजता’’ कांचन म्हणाला.
“तुझ्या दहा वाजता नको, माझ्या दहा वाजता.’’ शन्ना म्हणाले. दोघांनी हसून बोलणं संपवलं… आणि आश्चर्य म्हणजे तो दहाला ठरल्याप्रमाणे आलासुद्धा!
हातावरच्या घडय़ाळात पाहून म्हणाला, “वेळ पाळण्यासाठी कालपासून घडय़ाळ अर्धा तास पुढे ठेवलं होतं. आता मागे करतो’’ कांचन म्हणाला.
मग म्हणाला, “हे घडय़ाळ माझ्या बायकोने मला माझ्या लग्नाबद्दल प्रेझेंट दिलंय’’
“तू?… लग्न?… अरे, पण…’’ शन्नांना काय बोलावं तेच कळेना’’ परवा फोनवर का बोलला नाहीस?’’ शन्नांनी विचारलं तर कांचन म्हणाला, “आता माझ्या लग्नाचं ऐकून असे दचकलेले दिसलात तसे फोनवर दिसले नसता म्हणून नाही बोललो.’’
ते संभाषण ऐकून शन्नांची पत्नी बाहेर आली. म्हणाली, “ हे बघा पुढच्या वेळी एकटे आलात तर घरातच घेणार नाही.’’
नेहमीसारख्या शन्ना आणि कांचन यांच्या गप्पा रंगू लागल्या. एवढय़ात दारावरची घंटी वाजली. शन्नांची पत्नी दार उघडायला गेली. थोडासा वेळ मध्ये गेला तशी शन्नांची पत्नी दोघांसमोर आली आणि म्हणाली, “कुणी एक बाई आल्या आहेत. बाई कसल्या पोरगेलीशी आहे. तुम्हाला भेटायचं म्हणते आहे.’’
शन्ना त्रासले. “अरे पण आधी वेळ वगैरे न ठरवता?… तू असं कर, तिला तिकडच्या हॉलमध्ये बसव. चहाबिहा दे आणि मी इथे कुणासोबत महत्त्वाची चर्चा करतोय वगैरे सांग. फार तर संध्याकाळी यायला सांग.’’
शन्नांची पत्नी तिथून गेली आणि कांचन म्हणाला, “शन्ना, घ्या भेटून तिला. मी थांबतो थोडा वेळ.’’
“असं अचानक भेटायला येणं मला मुळीच खपत नाही.’’ शन्ना म्हणाले. तेवढय़ात त्यांची पत्नी तिथे आली. म्हणाली, “ती मुलगी शिरूरहून आल्येय आणि तिला तुमची मुलाखत पुण्याच्या कुठल्या तरी पेपरासाठी घ्यायचीय म्हणत्ये. मी तिला तुम्ही कामात असल्याचं सांगितलं तर ती म्हणत्ये की तिला संध्याकाळी परत जायचंय.’’
शन्ना चिडले. ते पत्नीला म्हणाले, “तिला पाठव इकडे. मी चांगलं खडसावतो तिला.’’ शन्नांची पत्नी त्या मुलीला घेऊन आली.
त्या मुलीने हसतमुखाने हात जोडले. म्हणाली, “मला आपली मुलाखत …’’
“ते कळलंय मला. पण तुम्ही असं आधी न कळवता येणं…’’
“ते चुकलंय माझं, पण आता शिरूरहून इथपर्यंत आल्येय. माझ्यासाठी थोडा वेळ…’’ ती म्हणाली.
“मुलाखत म्हणजे कमीत कमी दीडेक तास?’’
“हो. प्रदीर्घ मुलाखत म्हणजे…’’
“सॉरी. मला जमणार नाही. माझी आणि यांची चर्चा चालू आहे महत्त्वाची.’’
“समजा, मी यांची परवानगी घेतली तर?’’ ती म्हणाली.
“नाही चालणार. हे कोण आहेत माहित्ये?
“नाही.’’
“ हे कांचन नायक. चित्रपट दिग्दर्शक.’’
“अच्छा? मी यांचा ‘कळत नकळत’ चित्रपट पाहिलाय. यांना त्या चित्रपटाबद्दल राष्ट्रीय पारितोषिकदेखील मिळालं होतं ना? तुमची ‘लिसनर’वर चर्चा चालल्येय का?’’ ती म्हणाली तसं शन्ना चक्रावले.
“तुम्हाला ‘लिसनर’बद्दल कसं माहीत?’’ शन्नांनी विचारलं.
ती मुलगी हसली. म्हणाली, “कांचनकडूनच मी ती गोष्ट ऐकल्येय!’’
“म्हणजे?’’ शन्नांनी आश्चर्याने विचारले.
“मी सौभाग्यवती शुभांगी कांचन नायक!’’
शन्ना आणि त्यांची पत्नी दोघांकडे बघतच राहिले. कांचनने विचारलं. “आमची ओळखीची पद्धत आवडली?’’
“खूप!’’ दोघे म्हणाले.
शोधणारा साध्या गोष्टीतूनसुद्धा गंमत शोधतो आणि आनंदाची उधळण करतो.