
‘काँटा लगा…’ या गाण्यामुळे आणि ‘बिग बॉस 13’ या शोमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला (42) हिचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. सायंकाळी प्रकृती बिघडल्यामुळे तिला अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात आणले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून कलाकारांसह चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शनिवारी रात्री शेफालीच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेफालीच्या घरी शुक्रवारी सत्यनारायणाची पूजा होती. संध्याकाळी ती झोपेतून उठली तेव्हा तिचा रक्तदाब कमी झाला होता. तब्येत खालावल्याने शेफालीने सलाईन घेतले. यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. प्रकृती खालावल्याने शेफालीला अंधेरीच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिला दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला.
हृदयविकारामुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान, फॉरेन्सिक विभागाच्या टीमने शनिवारी सकाळी तिच्या घरी तपास केला. त्यानंतर तिचा पती पराग त्यागीसह चौघांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. सायंकाळी तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी आणले. तिला अखेरचा निरोप देण्यासाठी तिचे अनेक सहकलाकार, चाहते उपस्थित होते.
म्युझिक व्हिडीओज, रिऑलिटी शोमध्ये सोडली छाप
शेफाली अनेक म्युझिक व्हिडीओज, रिऑलिटी शोज आणि चित्रपटांत झळकली होती. 2002 मध्ये ‘काँटा लगा’ या गाण्यामुळे शेफाली रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. 1964 सालच्या ‘समझौता’ या चित्रपटातील ‘काँटा लगा’ या गाण्याचे हे रीक्रिएटेड व्हर्जन होते. पुढे ती नच बलिए 5, 7, ‘बिग बॉस 13’ या रिऑलिटी शोमध्ये झळकली. 2018 मध्ये ‘बेबी कम ऑन’ वेब सीरिजमध्ये ती श्रेयस तळपदेसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.