
ऍण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ 3 कसोटीतच जसप्रीत बुमराची गोलंदाजी सेवा घेणार असल्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच स्पष्ट केले होते. पहिल्या कसोटीतील पराभवानंतरही गंभीर यांनी बुमराला तीनच कसोटीतच खेळवण्याचा पुनरुच्चार करत एजबॅस्टनला विश्रांती देणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र हिंदुस्थानचे कसोटीतील गोलंदाजी आक्रमण हे फक्त आणि फक्त जसप्रीत बुमराच्या खांद्यावर अवलंबून असून त्याला एजबॅस्टनवरही खेळवावे, असा सल्ला अनेक दिग्गज करत असल्यामुळे बुमराचा दरारा एजबॅस्टनवर दिसण्याची शक्यता वाढली आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी सरावासाठी उतरलेल्या बुमराला पाहून हे संकेत सत्य होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
इंग्लंडचे माजी महान फलंदाज ऍलन लॅम्बही बुमराबद्दल आपले मत व्यक्त करत म्हणाले, वन डेत हिंदुस्थानी संघाचा दबदबा आहे, मात्र कसोटीत बुमराशिवाय पर्याय नाही. बुमराच्या गोलंदाजीशिवाय हिंदुस्थानी संघ अपूर्ण आहे. सध्या संघात त्याच्या तोडीचा एकही गोलंदाज नसल्यामुळे हिंदुस्थानची गोलंदाजी लंगडी वाटते. हिंदुस्थानची गोलंदाजी पूर्णपणे बुमराच्याच खांद्यावर अवलंबून असल्याचे सांगत त्याची गोलंदाजी एजबॅस्टनवरही दिसायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.
बुमरा नसला तर हिंदुस्थान 0-2
हेडिंग्ले कसोटीत हिंदुस्थानसाठी बुमराने अप्रतिम गोलंदाजी केली. दुसऱ्या डावातही त्याने इंग्लिश फलंदाजांना बाद करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण इंग्लिश फलंदाजांनी बुमरासमोर बचावात्मक खेळण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांनी आपली विकेट राखण्यात यश मिळवले. त्यांची हीच रणनीती यशस्वी ठरली. आता 0-1ने पिछाडीवर असलेला हिंदुस्थान दुसऱ्या कसोटीत बुमराशिवाय खेळला तर गोलंदाजी अधिक बोथट होईल आणि इंग्लंडला मालिकेत 2-0 आघाडी घेण्यास अनुकूल वातावरण मिळू शकेल. त्यामुळे ही संभाव्य हानी रोखण्यासाठी बुमराला एजबॅस्टनवरही संघात खेळवावे, असा सूर आहे. कारण एजबॅस्टन कसोटी गमावली तर हिंदुस्थानला दारुण मालिका पराभवापासून कुणीच रोखू शकणार नाही. तसेच 2-0 ने आघाडीवर असलेल्या यजमानांचे उंचावलेले मनोधैर्य हिंदुस्थानी संघाचे खच्चीकरण करण्यास पुरेसे ठरेल. या शक्यतेमुळे संघव्यवस्थापन बुमराच्या विश्रांतीचा निर्णय पुढे ढकलून एजबॅस्टनमध्ये त्याची निवड करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.