
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई महापालिकेतील शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. शिक्षकांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता पूर्णवेळ कार्यालयात राहून निवडणुकीचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी स्थानिक मतदार नोंदणी कार्यालयात रुजू होण्याची गरज नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये तसेच मूळ आस्थापनेतून कार्यमुक्त न होता, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच निवडणुकीशी संबंधित कामे ऑनलाइन पद्धतीने करणे शक्य होणार आहे. यासाठी ‘ईआरओ’ कार्यालयात रुजू होण्याची आवश्यकता नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबई शहर जिल्हा तसेच मुंबई उपनगर जिह्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षकांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच धर्तीवर शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.