
चंद्रपूर शहरातील नाला रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यात आज चांगलीच जुंपली. तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्द्यांना ‘सजेशन फॉर अॅक्शन’ असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंत्री राठोड यांना, ‘हे काय दादा कोंडकेंचे उत्तर आहे?’ अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी सुनावले.
मंत्री राठोड आमचे मित्र आहेत. मंत्र्याने एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर हमी द्यायला हवी. नाल्याची नैसर्गिक रुंदी तशीच ठेवली जाईल. ती हमी न देता सजेशन फॉर अॅक्शन हे काय उत्तर आहे? हे तर द्वय़र्थी उत्तर झालं. हे काय दादा कोंडकेंचं उत्तर आहे? त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या, असे मुनगंटीवार संतापून म्हणाले.