
>>सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]
चीनकडून पुरवठा होणाऱ्या फेंटानिलच्या घटक पदार्थांवर नियंत्रण आणण्याचे अमेरिकेने चीनला कळविले असल्याचे सांगतात. चीनकडून होणाऱ्या फेंटानिलच्या काही घटक द्रव्यांच्या पुरवठ्यासाठी मेक्सिकोमधील काही बँकांवरही अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या बँकांमधून फेंटानिलचे चीनबरोबरील आर्थिक व्यवहार सांभाळले जात होते. फेंटानिलचा प्रश्न अमेरिकेसाठी मोठा चिंताजनक असल्याने अमेरिकेने फेंटानिलच्या चीनकडून होणाऱ्या पुरवठ्यावर नियंत्रण आणण्यासाठी वाढीव टॅरिफ चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर लादले आहे.
फेंटानिल या सिंथेटिक अमली पदार्थाने गेली अनेक वर्षे अमेरिकेत, कॅनडामध्ये धुमाकूळ घातला आहे. एकतर कमी किमतीत मिळणाऱ्या फेंटानिलच्या गोळ्या पोटामध्ये गिळण्यास सोप्या, पण प्रयोगशाळेत विविध रासायनिक पदार्थांचे मिश्रण करून बनविलेल्या या गोळ्यांमुळे युवा पिढी मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडत आहे. फेंटानिलच्या व्यापारातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यामुळे सीमावर्ती कस्टम्स अधिकारी ते स्थानिक पोलीस यांना हाताशी धरून हा फेंटानिलचा व्यापार बिनबोभाटपणे चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येताच त्यांनी एफबीआयच्या प्रमुखपदी नेमलेल्या कॅश पटेल यांनी फेंटानिलचा अमेरिकेतील प्रसार रोखण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत.
फेंटानिलमध्ये असे काय आहे की, ज्याच्याबद्दल अमेरिकेत बोंबाबोंब चालू आहे? तर त्याचे उत्तर आहे या फेंटानिलची किंमत. फेंटानिल हा प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या बनविला गेलेला अमली पदार्थ आहे. या पदार्थामध्ये नैसर्गिकरीत्या कोठल्या झाडाच्या पानापासून अथवा फुलांपासून अर्क काढला जात नाही, तर ते पूर्णतः सिंथेटिक आहे. म्हणजे सुमारे 10 ते 11 रासायनिक पदार्थांच्या मिश्रणातून ते बनविले जाते. सुरुवातीला फेंटानिल हे शस्त्रक्रियेनंतर वेदनाशामक औषध म्हणून विकसित करण्यात आले होते, पण त्याचा प्रवास नंतर अमली पदार्थामुळे मिळणाऱ्या गुंगीसाठी होत गेला.
फेंटानिल लोकप्रिय होण्यामागचे अजून एक कारण म्हणजे त्याच्यामुळे झटपट मिळणारी किक आणि सुलभ उपलब्धता. फेंटानिल हे गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध केले जाते. गोळी पोटात गेली की, झटपट किक मिळणारच, पण हे पूर्ण रासायनिक आणि प्रयोगशाळेत बनविले गेले असल्यामुळे त्याच्या उपभोक्त्याच्या शरीराचे, आतड्यांचे मोठे नुकसान होते आणि फेंटानिल नियमितपणे घेणाऱ्याचा मृत्यू ठरलेलाच असतो. गेल्या दोन वर्षांत फक्त अमेरिकेत 70 हजारांपेक्षा जास्त युवकांचा या फेंटानिलमुळे मृत्यू झाला असल्याचे अमेरिकन सरकारकडून जाहीरपणे सांगण्यात आलेले आहे.
फेंटानिल बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल चीनमधून मेक्सिकोमध्ये येतो. तेथे सर्व रासायनिक घटकांपासून फेंटानिलच्या गोळ्या बनविल्या जातात. मेक्सिको हा दक्षिण अमेरिकेतील देश आहे. या देशाच्या भौगोलिक सीमा अमेरिकेला भिडलेल्या आहेत. सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीपेक्षा जास्त या भौगोलिक सीमा भिडलेल्या आहेत. त्यामुळे मेक्सिकोमधून प्रचंड प्रमाणात बेकायदेशीरपणे स्थलांतरित अमेरिकेत घुसतात हे उघड सत्य आहे. इतकी वर्षे अमेरिकेत कोकेन, हेरॉईन आणि तत्सम अमली पदार्थ अमेरिकेत विकणारे माफिया फेंटानिलकडे वळले कसे? तर त्याचे उत्तर आहे प्रचंड नफा.
मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेवर मेक्सिकोमधून अमेरिकेत येणाऱ्या सर्व पदार्थांच्या आयातींवर अमेरिकेच्या कस्टम अधिकाऱ्यांकडून बारकाईने पाळत ठेवली जाते. त्यामुळे फेंटानिलच्या गोळ्या मेक्सिकोमध्ये बनविल्या गेल्यानंतर त्या उत्तर अमेरिकेत पाठविल्या जातात. उत्तर अमेरिका म्हणजे कॅनडामध्ये पाठविल्या जातात. कॅनडा आणि अमेरिकेच्या भौगोलिक सीमा सुमारे आठ हजार किलोमीटर एवढ्या लांब पसरलेल्या आहेत. या एवढ्या लांब सीमेवरून अमेरिकेत घुसण्यासाठी सोपा आणि सहज मार्ग माफियांकडून शोधला जातो. मालाची वाहतूक करण्यासाठी सर्व वाहनांचा पुरवठा या माफियांकडून केला जातो.
चीनमधील कम्युनिस्ट पक्षातील अनेक वरिष्ठ लाचखोर अधिकारी, बांधकाम क्षेत्रातील उद्योगपती यांनी अमली पदार्थांच्या मेक्सिको ते व्हाया कॅनडातील व्हॅन्कुव्हरमार्गे चालणाऱ्या या धंद्यात मोठी गुंतवणूक केलेली असल्याचे सांगतात. अमली पदार्थांच्या टोळ्यांना रोख रकमेची नेहमी तूट भासत असते. तेथे चीनमधील वर उल्लेखलेल्यांनी मोठी गुंतवणूक केल्याचे दिसून आलेले आहे. फेंटानिल या अमली पदार्थाची अमेरिकेत, कॅनडामध्ये आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांत सध्या मोठी चर्चा आहे. हा अमली पदार्थ चीनकडून प्रायोजित होत असल्याची चर्चा आहे.
फेंटानिलमुळे या देशांमध्ये अनेक लोकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या प्रमाणात प्राण गमावले असून अमेरिकेत फेंटानिलचा जोरदार प्रसार झालेला आहे. कॅनडाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या किनारी भागात लॅटिन अमेरिकेतील अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या अनेक टोळ्यांची प्रमुख कार्यालये आहेत. चीन या अमली पदार्थांच्या व्यापाराआडून हेरगिरी करतो असेही चीनवर आरोप झालेले आहेत. 2019 मध्ये रॉयल कॅनडियन पोलीस सर्व्हिसमधील एक उच्च अधिकारी कॅमेरून ऑर्टिस याला अटक झाल्यावर यासंदर्भातील अनेक स्फोटक माहिती बाहेर आलेली होती. कॅनडामध्ये खूप खोलवर या मेक्सिकन ड्रग कार्टेलनी प्रवेश केला असल्याचे असे बोलले जाते.
फेंटानिलच्या अमेरिकेतील आणि कॅनडातील प्रसारामागे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा हात असल्याचे बोलले जाते.
कॅनडामधील शोध पत्रकारितेतील प्रसिद्ध पत्रकार सॅम कूपर यांनी त्यांच्या ‘विलफुल ब्लाइंडनेस’ (ऐच्छिक डोळेझाक) या पुस्तकात कॅनडातील राजकारणी आणि चीन यांच्यामधील साटेलोटे याबद्दल बरीच माहिती दिली आहे. या अमली पदार्थांच्या व्यापारातून मिळणाऱ्या नफ्यामधून या माफियांनी कॅनडामधील बांधकाम क्षेत्रात तसेच कॅसिनोमध्ये खूपच मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे चीन ते व्हाया हाँगकाँग ते कॅनडामधील व्हॅन्कुव्हर असा थेट व्यापार होतो अथवा चीन ते व्हॅन्कुव्हर व्हाया मेक्सिकोमधील अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या टोळ्या असाही होतो, असे सॅम कूपर सांगतात.
फेंटानिलच्या प्रसाराला रोखण्यासाठी अमेरिकेतील एफबीआयचे प्रमुख कॅश पटेल यांनी भारत सरकारकडून जाहीरपणे मदत मागितली होती. म्यानमार आणि त्याच्या सीमेला भिडलेली पूर्वोत्तर भारतातील राज्ये यामधील अमली पदार्थांच्या वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी अमेरिकेने ही विनंती भारताला केली असावी. चीनमधून होणाऱ्या या पुरवठ्याची वाहतूक भारतातील काही बंदरे, इतर अंतर्गत वाटा यांच्यामधून जात असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
चीनकडून पुरवठा होणाऱ्या फेंटानिलच्या घटक पदार्थांवर नियंत्रण आणण्याचे अमेरिकेने चीनला कळविले असल्याचे सांगतात. चीनकडून होणाऱ्या फेंटानिलच्या काही घटक द्रव्यांच्या पुरवठ्यासाठी मेक्सिकोमधील काही बँकांवरही अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या बँकांमधून फेंटानिलचे चीनबरोबरील आर्थिक व्यवहार सांभाळले जात होते. फेंटानिलचा प्रश्न अमेरिकेसाठी मोठा चिंताजनक असल्याने अमेरिकेने फेंटानिलच्या चीनकडून होणाऱ्या पुरवठ्यावर नियंत्रण आणण्यासाठी वाढीव टॅरिफ चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर लादले आहे. जसजसे चीनकडून कडक नियंत्रण आणले जाईल तसतसे हे वाढीव टॅरिफ हटविले जाईल असे दिसते.